इंग्लंड आणि भारत यांच्यातील रिशेडूल केलेली एकमेव टेस्ट जुलै 2022मध्ये खेळली गेलेली. त्या टेस्टमध्ये शतक झळकावल्यानंतर भारताच्या रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांचे नाव एजबॅस्टनच्या ड्रेसिंग रूममधील ऑनर्स बोर्डवर लिहिले गेले. आजकाल जगभरातील जवळपास सर्वच स्टेडियममध्ये असे ऑनर्स बोर्ड लावले जातात. मात्र, ज्या ऑनर्स बोर्डला सर्वाधिक मान मिळतो तो म्हणजे, क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावरील ऑनर्स बोर्ड. प्रत्येक इंटरनॅशनल क्रिकेटरचे लॉर्ड्सवर खेळणे हे एक स्वप्न असते. बॅटर असेल तर शतक आणि बॉलर असेल, तर एका इनिंगमध्ये फाईव्ह विकेट हॉल मिळवून, लॉर्ड्सवरील ‘ऑनर्स बोर्ड’वर आपले नाव पाहण्याची सुप्त इच्छा प्रत्येक खेळाडूमध्ये असते. या ‘ऑनर्स बोर्ड’वर सर डॉन ब्रॅडमन, सर गारफील्ड सोबर्स, विव रिचर्ड्स, मार्टिन क्रो, राहुल द्रविड या दिग्गजांनी आपले नाव कोरले. याचसोबत, काही सामान्य खेळाडू सुद्धा ‘ऑनर्स बोर्ड’वर आपले नाव झळकवण्यात यशस्वी ठरले. परंतु क्रिकेटजगतात असेही काही दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना त्या मानाच्या जागेवर आपले नाव लिहिता आले नाही. आज त्याच कमनशिबी दिग्गजांची माहिती देणारा हा लेख.
क्रिकेट इतिहासातील ऑल टाईम ग्रेट बॅटर्सपैकी एक असलेले सुनील गावसकर हे लॉर्ड्सवर कधीही शतक झळकावू शकले नाहीत. लॉर्ड्सवर गावस्कर यांनी पाच टेस्ट खेळल्या. यात दोन वेळा त्यांनी अर्धशतकाची वेस ओलांडली. मात्र, शतकापासून ते दूरच राहिले. लॉर्ड्सवर त्यांची सर्वोच्च धावसंख्या 59 इतकी राहिली. गावसकर यांनी इंग्लंडमध्ये 16 टेस्ट खेळताना 1152 रन्स केल्या. यात 4 शतकांचा समावेश होता. 1987 मध्ये गावसकर यांनी वर्ल्ड इलेव्हनसाठी खेळताना एमसीसी विरुद्ध लॉर्ड्सवर 188 रन्सची इनिंग खेळलेली. पण, ती मॅच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ग्राह्य धरली गेली नाही. परिणामी, त्यांचे नाव ‘ऑनर्स बोर्ड’ वर लागू शकले नाही.
भारताच्याच सचिन तेंडुलकरला ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणून ओळखले जाते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी शंभर शतके नावावर असलेल्या सचिनला लॉर्ड्सवर मात्र आपली बॅट उंचावता आली नाही. आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ करिअरमध्ये सचिन पाच वेळा इंग्लंडच्या टूरवर गेला. या पाच टूरवर सचिनने पाच मॅचेस या ऐतीहासिक मैदानावर खेळल्या. त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त 37 इतकी होती. आपले आदर्श सुनील गावसकर यांच्याप्रमाणेच, सचिननेदेखील 1998 मध्ये एमसीसीकडून खेळताना वर्ल्ड इलेव्हनविरुद्ध 125 रन्सची शतकी खेळी केली होती. मात्र, टीम इंडियासाठी तो एकदाही या मैदानावर शतक ठोकण्याचा कारनामा करू शकला नाही. शेवटी त्याचेही लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर आपले नाव लावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
सचिन तेंडुलकरसोबत महानतेबाबतीत नेहमीच तुलना होणारा बॅटर म्हणजे वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा. वेस्ट इंडीजसाठी तिसऱ्या नंबरवर बॅटिंग करून अनेक विक्रमांना गवसणी घालणारा लारा हा देखील कधीही लॉर्ड्सवर शतक करू शकला नाही. टेस्ट क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये सर्वोच्च 400 रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असलेल्या लाराने लॉर्ड्सवर 6 टेस्ट खेळताना अवघ्या 126 रन्स बनवल्या आहेत. यात केवळ एक अर्धशतक समाविष्ट आहे. लाराची लॉर्ड्सवर असलेले 22.66 हे बॅटिंग ऍवरेज त्याच्या इंटरनॅशनल ऍव्हरेज 52.88 पेक्षा खूपच कमी आहे. त्याच्या समकालीन सचिन तेंडुलकरप्रमाणे त्याला देखील या लॉर्ड्सचा लॉर्ड होता आले नाही.
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचे नाव घेतले जाते. बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही विभागात तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा मॅचविनर होता. सचिन आणि पॉंटिंगनंतर सर्वाधिक टेस्ट रन करणारा तो बॅटर आहे. 45 टेस्ट शतक आणि 292 टेस्ट विकेट नावावर असलेल्या कॅलिसला बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये शतक अथवा पाच विकेट्स घेऊन ऑनर्स बोर्डवर जाण्याची संधी होती. मात्र, तीन वेळा क्रिकेटच्या या पंढरीत खेळून तो केवळ 54 रन्स आणि एकूण 6 विकेट्स घेऊ शकला. आपण लॉर्ड्सवर छाप पाडू शकलो नाही याची खंत त्याला आजही वाटते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेंटलमन्सच्या खेळात ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिलेली भारतीय सलामीवीराला धमकी, पण मागे हटेल तो भारतीय कसला
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच