भारत विरुद्ध इंग्लंडच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला कालपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना काल पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने तिन्ही आघाड्यांवर वर्चस्व गाजवत इंग्लंडला ६६ धावांनी पराभूत केले. यासह मालिकेत १-० अशी आघाडी देखील घेतली.
या सामन्यात भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी वनडे पदार्पण केले. यातील अष्टपैलू कृणाल पंड्या यापूर्वी भारतीय संघाकडून टी२० सामने खेळला होता. मात्र वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदार्पण होते. मात्र पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ४ बळी घेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या कामगिरीने प्रभावित होऊन दिग्गजांनी आता त्याची पाठ थोपटली आहे.
सुनील गावसकरांनी केले कौतुक
भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर हे प्रसिद्ध कृष्णाच्या कामगिरीने प्रभावित झालेले दिसले. सामन्यांनंतर त्याचे कौतुक करतांना गावसकर म्हणाले, “प्रसिद्ध कृष्णा सामन्यात सुरुवातीला महागडा ठरला होता. त्याच्या गोलंदाजीवर खूप धावा निघाल्या. मात्र त्यानंतर त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले, ते कौतुकास्पद आहे. त्याने आधी पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी टाकली, जिथे त्याला फार फायदा नाही मिळाला. मात्र त्यानंतर हिल एंड कडून गोलंदाजीला आल्यावर त्याला बाऊन्स मिळाला, ज्याचा त्याने अचूक फायदा उठवला.”
प्रसिद्ध कृष्णाने केला खास रेकॉर्ड
प्रसिद्ध कृष्णाने या सामन्यात एका खास विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात त्याने ४ बळी घेत २५ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरीचा रेकॉर्ड त्याने ५४ धावांत ४ बळी घेत आपल्या नावे केला. यापूर्वी हा रेकॉर्ड नोएल डेव्हिड यांच्या नावे होता.
ग्लेन मॅकग्राने थोपटली पाठ
याच रेकॉर्डचा उल्लेख करत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने देखील प्रसिद्ध कृष्णाचे कौतुक केले. इंस्टाग्रामवर पोस्ट लिहित मॅकग्रा म्हणाला, “पदार्पणाच्या सामन्यात ५४ धावांत ४ बळी घेण्यासाठी प्रसिद्ध तुझे अभिनंदन. तसेच वनडे पदार्पणात भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी देखील अभिनंदन. छान खेळलास मित्रा!”
दिग्गजांनी केलेल्या या कौतुकाने प्रसिद्ध कृष्णाच्या अंगावर नक्कीच मूठभर मांस चढले असेल. आता उर्वरित मालिकेत देखील हाच फॉर्म कायम राखत भारताला मालिका विजय मिळवून देण्याचा तो प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीचा ‘हा’ खेळाडू अडकणार विवाह बंधनात, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
विराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय मांजरेकरांनी साधला निशाणा, म्हणाले….