शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया खेळाडूंनी केलेले चेंडू छेडछाड प्रकरणाने क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक निर्णय समोर आले आहेत .
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निलंबनाची कारवाई केली आहे.
पण त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्दोष मुक्तता केली होती. तसेच ते पुढेही प्रशिक्षकपदावर कायम राहतील असेही सांगितले होते.
पण आता नुकतेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटकरून लेहमन यांनीही प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. उद्यापासून सुरु होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना हा लेहमन यांचा ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणूनही शेवटचा सामना असणार आहे.
या निर्णयाबद्दल लेहमन म्हणाले, ” खेळाडूंना गुडबाय म्हणणे ही माझ्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात अवघड गोष्ट आहे.” त्याचबरोबर ते म्हणाले, “राजीनामा देण्याचा संपूर्णपणे माझा निर्णय होता. मी मागील काही दिवसांपासून मी वरिष्ठांशी या विषयावर चर्चा केली आहे.”
https://twitter.com/CricketAus/status/979327149986537473
लेहमन यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलिया संघाने २९ मार्च २०१५ ला म्हणजे बरोबर तीन वर्षांपूर्वी विश्वचषक विजेतेपद मिळवले होते.