पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला यूएसए (USA) सोबत होणार आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयसीसी (ICC) चेअरमन जय शहा (jay Shah) यांनी विश्वचषकाचे पहिले तिकीट अधिकृतपणे लॉन्च केले. यावेळी, जय शहांनी फुटबॉलपटू लुइस सुआरेज आणि रोड्रीगो डी पॉल यांना भारतीय टी20 विश्वचषकाची जर्सी भेट दिली. या कार्यक्रमाला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचीही उपस्थिती होती.
जय शहांनी लियोनेल मेस्सीला (Lionel Messi) भारत आणि यूएसए यांच्यातील 7 फेब्रुवारीला होणाऱ्या टी20 विश्वचषक सामन्याचे तिकीट भेट दिले. हा टी20 विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत खेळला जाईल.
हा दिवस लियोनेल मेस्सीच्या ‘GOAT टूर’ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम टूर) चा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. मेस्सीने यापूर्वी कोलकाता, हैदराबाद आणि मुंबईचा दौरा केला होता. अरुण जेटली स्टेडियममध्ये मेस्सी, सुआरेज आणि डी पॉल यांनी लहान मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला.
या स्टेडियमवर एक प्रदर्शनी (Exhibition) फुटबॉल सामना देखील खेळवण्यात आला. मिनर्वा, मेस्सी ऑलस्टार्स संघाने सेलिब्रिटी मेस्सी ऑल स्टार्स संघाला 6-0 ने हरवले. मैदानात उपस्थित असलेल्या 22,000 चाहत्यांनी ‘मेसी, मेसी’ चे नारे लावले. मेस्सी, सुआरेज आणि डी पॉल यांनी मैदानाला फेरी मारून, चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांच्या दिशेने बॉल देखील फेकला.






