रविवारचा (13 सप्टेंबर) दिवस भारतासाठी खास ठरला, कारण या दिवशी भारताने एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल तीन आशिया चषक जिंकले. यावर तुमचा विश्वास बसत नसेल, मात्र हे खरं आहे. रविवारी तीन आशिया चषकाचे अंतिम सामने खेळले गेले आणि या तिन्ही सामन्यांमध्ये भारतच विजेता ठरला.
आशिया चषकाचा एक अंतिम सामना क्रिकेटमध्ये तर दोन हॉकीमध्ये खेळले गेले. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघांनी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर एएचएफ ज्युनियर हॉकी आशिया चषक 2026 मध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी आपापले अंतिम सामने जिंकले. या विजयामुळे दोन्ही संघ ज्युनियर हॉकी विश्वचषक 2027 साठी पात्र ठरले आहेत.
चीनमध्ये ज्युनियर हॉकी आशिया चषक 2026 खेळला गेला. यामध्ये भारतीय महिला संघाने यजमान चीनला 1-0 ने पराभूत केले आणि आपले विजेतेपद कायम राखले. याबरोबरच भारताने अव्वल चारपैकी एक संघ म्हणून पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या ज्युनियर हॉकी विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. हा एकमेव गोल सानिका मानेने सामन्याच्या 17व्या मिनिटाला केला.
पुरुष हॉकी संघाच्या सामन्याची स्थिती बोलायची झाली तर, भारताने सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर त्यांनी 2027 च्या विश्वचषकातही आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेत भारत अनमोल एक्काच्या नेतृत्वाखाली खेळला. त्याने या स्पर्धेत तब्बल 17 गोल केले. भारताने उपांत्य फेरीत मलेशियाला 3-1 ने आणि अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभूत केले. तसेच कांस्यपदकाच्या सामन्यात पाकिस्तानने मलेशियाला 4-2 ने पराभूत केले.
क्रिकेटच्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला 184 धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. भारताकडून सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी अर्धशतके केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यास आलेल्या श्रीलंकेचा संपूर्ण संघ 20 षटकांत 111 धावसंख्येवर सर्वबाद झाला.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. भारताने हा सामना जिंकताच आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. भारताने एकदिवसीय आणि टी20 प्रकाराच्या आशिया चषकामध्ये प्रत्येकी चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. (India won three Asia Cup title on Sunday 13th September 2026 ; before Dubai, happy news arrived from ‘this’ country.)






