कबड्डी हा मराठमोळा खेळ,महाराष्ट्राच्या मातीनेच जगाला हा खेळ दिला. त्यामुळे प्रो कबड्डीत मराठी खेळाडूंचा भरणा नसता तर नवलच होते! प्रो कबड्डीत महाराष्ट्राचे खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळताना बघायला मिळतील. एक ओळख विविध संघांतील महाराष्ट्राच्या खेळाडूंची:
१.यू मुम्बा:
काशिलिंग आडके:
मूळचा सांगलीचा असलेला काशी ‘हनुमान उडीसाठी’ विशेष प्रसिध्द आहे! ५२ सामन्यांत तब्बल ४०६ गूण मिळवत काशी हा प्रो काबड्डीतल्या प्रमुख चढाईपटूंमध्ये येतो!
नितीन मदने:
२०१४ च्या आशियाई स्पर्धांमध्ये ‘सुवर्णपदक’ मिळवणाऱ्या संघात असलेला नितीन दुखपतींमुळे प्रो कबड्डीत तितकीशी चमक दाखवू शकला नसला तरी अनुप कुमारच्या मार्गदर्शनाखाली तो चमकदार कामगिरी करू शकतो!
*श्रीकांत जाधव या युवा खेळाडूचाही समावेश संघात करण्यात आलेला आहे!
२.पुणेरी पलटण:
गिरीश एर्नाक:
महाराष्ट्राच्या संघाकडून ‘डावा कोपरारक्षक’ म्हणून खेळणारा गिरीश यंदा पुण्याचाही डावा कोपरा सांभाळेल. ‘अँकल होल्ड’ मध्ये गिरीशला विशेष प्राविण्य आहे!
उमेश म्हात्रे:
महाकबड्डी लीगमध्ये जोरदार खेळ करून लोकप्रिय झालेला उमेश या आधी ‘दबंग दिल्ली’कडून काही सामने खेळला आहे. महाकाबड्डी लीगमधील प्रदर्शन प्रो कबड्डीत करून दाखवण्याची आव्हान त्याच्यासमोर असेल!
याशिवाय अक्षय जाधव आणि जीबी मोरे यांचाही संघात समावेश आहे.
३.दबंग दिल्ली:
निलेश शिंदे:
महाराष्टाराचा अनुभवी खेळाडू निलेश याआधी ‘बंगाल वॉरियर्स’चा कर्णधार होता. तो एक अत्यंत उत्कृष्ट ‘उजवा कोपरारक्षक’ आहे!
बाजीराव होडगे:
उजव्या मध्यरक्षकाच्या’ भूमिकेत खेळताना या खेळाडूने भल्याभल्यांना घाम फोडलेला आहे. तिसऱ्या पर्वात ‘पटना पायरेट्स’ला जेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती!
सुरज देसाई:
महाकबड्डी लिगमधल्या सर्वोत्तम चढाईपटूंमध्ये सुरजचे नाव घेतले जाते! त्याच जोरावर दिल्लीने त्याची निवड केली आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची त्याची इच्छा असेल!
स्वप्नील शिंदे:
महाकबड्डी लिगमधील अजून एक मोठे नाव!’ उजवा मध्यरक्षक’ म्हणून तो संघात असेल.
आनंद पाटील या नवख्या खेळाडूलाही संधी देण्यात आलेली आहे.
४.युपी योद्धाज:
रिशांक देवाडीगा:
प्रो कबड्डीतील महाराष्ट्राचे सर्वात मोठे नाव!’ डू ऑर डाय’ विशेषज्ञ म्ह्णून ख्याती असलेला रिशांक अल्पावधीतच चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे!युपीची चढाईची धुरा त्याच्यावर असेल.
५.तेलुगू टायटन्स:
निलेश साळुंखे:
उत्कृष्ट चढाईपटू! महाराष्ट्राच्या संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या निलेशने याआधीही तेलुगू टायटन्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे! त्याचीच पुनरावृत्ती त्याच्याकडून अपेक्षित असेल.
६.पाटणा पायरेट्स:
विशाल माने:
प्रो कबड्डीतलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व! ‘ब्लॉक्स’साठी प्रसिद्ध असलेला विशाल कोणत्याही खेळाडूला एकाहाती ‘टॅकल’ करण्याची क्षमता ठेवतो. पटनाच्या मध्यरक्षणाची भिस्त त्याच्यावर असेल.
सचिन शिंगाडे:
सचिनच्या रूपात पाटणाला भक्कम ‘डावा मध्यरक्षक’ लाभला आहे. महाराष्ट्राच्या संघातही त्याचा समावेश आहे.
पाटणाचं मध्यरक्षण मराठमोळं आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही!
७.जयपूर पिंक पँथर्स:
तुषार पाटील:
चांगला चढाईपटू!मागच्या पर्वातील त्याच्या कामगिरीनंतर त्याच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या असतील!
८.गुजरात फॉर्च्युन जायंट्स:
महेंद्र राजपूत:
महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव असणारा महेंद्र सध्या महाराष्ट्राच्या संघात नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करून महाराष्ट्राच्या संघात पुनरागमन करण्याची संधी त्याच्याकडे आहे!
सुलतान डांगे:
महाकबड्डी लिगमध्ये जोरदार कामगिरी करत सुलतानने ‘रायगड डायनामोज’ संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. महाराष्ट्राच्या संघातही त्याचा समावेश होता त्यामुळे तो कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!
विकास काळे:
महाराष्ट्र संघाचा कर्णधार असलेला विकास प्रो कबड्डीमध्ये फारशी चमक दाखवू शकलेला नाही. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंना या पर्वात चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा!
-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )