ब्रिस्टोल। इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला संघात एकमेव कसोटी सामन्याला बुधवारी (१६ जून) सुरुवात झाली. भारतीय महिला संघ जवळपास तब्बल ७ वर्षांनी कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघात कर्णधार मिताली राज आणि गोलंदाज झुलन गोस्वामी सर्वात अनुभवी खेळाडू असून त्यांच्या नावावर खास विक्रम झाला आहे.
सर्वाधिक काळ कसोटी कारकिर्द असणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू
मिताली आणि झुलन या दोघींनी १४ जानेवारी २००२ रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातूनच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता त्या कारकिर्दीतील ११ वा कसोटी सामना खेळत आहेत. त्यामुळे त्यांची कसोटी कारकिर्द तब्बल १९ वर्षे १५३ दिवसांची झाली आहे. त्यामुळे त्या सर्वाधिक काळ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. तर जगातील एकूण तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ कसोटी क्रिकेट खेळण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या वेरा बर्ट (२० वर्षे ३३५ दिवस) यांच्या नावावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मेरी हाईड (१९ वर्षे २११ दिवस) आहे.
विशेष म्हणजे सर्वाधिक काळ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारताच्या एकूण पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंमध्ये देखील मिताली आणि झुलन या दोघींचा दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याची २४ वर्षे १ दिवस कसोटी कारकिर्द राहिली. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर लाला अमरनाथ आहेत. त्यांची १९ वर्षे कसोटी क्रिकेट कारकिर्द राहिली.
महत्त्वाचं म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज समजल्या जाणाऱ्या राहुल द्रविड, सौरव गांगुली यांचा या यादीत पहिल्या १० जणांमध्येही समावेश नाही. १६४ कसोटी खेळणाऱ्या द्रविडची १५ वर्षे २२२ दिवस कसोटी कारकिर्द राहिली, तर गांगुली १२ वर्षे १४३ दिवस कसोटी क्रिकेट खेळला.
सर्वाधिक काळ कसोटी कारकिर्द राहिलेले भारतीय क्रिकेटपटू (महिला आणि पुरुष)
२४ वर्षे १ दिवस – सचिन तेंडुलकर
१९ वर्षे १५३ दिवस – मिताली राज आणि झुलन गोस्वामी
१९ वर्षे ० दिवस – लाला अमरनाथ
१८ वर्षे २१४ दिवस – एस वेंकटराघवन
१८ वर्षे ८५ दिवस – अनिल कुंबळे
कसोटी क्रिकेट खेळणारी सर्वात वयस्कर भारतीय महिला खेळाडू
याशिवाय झुलन आणि मितालीच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम झाला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूंच्या यादीत झुलन अव्वल क्रमांकावर तर मिताली दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
बुधवारी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी या दोघी मैदानात उतरल्या तेव्हा झुलनचे वय ३८ वर्षे आणि २०३ दिवस इतके होते आणि मितालीचे ३८ वर्षे १९५ दिवस इतके होते. या दोघींपाठोपाठ या यादीत डायना एडुलजी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला तेव्हा त्यांचे वय ३५ वर्षे १४ दिवस होते.
महत्त्वाच्या बातम्या –
स्मिथ पुन्हा कसोटीत ‘अव्वल’; विराटला क्रमवारीत फायदा तर विलियम्सनची घसरण, वाचा सविस्तर
महिला कसोटी सामन्यासाठी दिली वापरलेली खेळपट्टी, इंग्लंडची कर्णधार आपल्याच बोर्डावर संतापली
बीसीसीआयला मोठा दिलासा! ‘त्या’ आयपीएल संघाला नाही द्यावे लागणार ४८०० कोटी रुपये नुकसान भरपाई