इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील लॉर्ड्स मैदानावरील दुसरा सामना एकतर्फी जिंकत इंग्लंडने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले २४५ धावांचे आव्हान पाकिस्तानला पूर्ण करण्यात अपयश आले व त्यांना ५२ धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवातही पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज हसन अली याने एक विक्रम रचला.
हसन अलीची भेदक गोलंदाजी
पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी विभागात दमदार पुनरागमन केले. पाकिस्ताने इंग्लंडचा डाव २४७ धावांमध्ये गुंडाळला. पाकिस्तानच्या मार्याचे नेतृत्व अनुभवी हसन अलीने केले. त्याने ९.२ षटके गोलंदाजी करत ५१ धावा देत ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, टी२० क्रमवारीतील अव्वल फलंदाज डेव्हिड मलान, यष्टीरक्षक जॉन सिंपसन, क्रेग ओव्हरटन व साकीब मेहमूद यांचा समावेश होता.
अलीने बनविला विक्रम
हसन अलीने या ५ बळींसह आपल्या ५६ वनडे सामन्यांच्या कारकिर्दीत चौथ्यांदा पाच बळी घेण्याची किमया केली. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये वनडे सामन्यात पाच बळी मिळवणारा तो केवळ तिसरा पाकिस्तानी गोलंदाज बनला. यापूर्वी, वकार युनुस व उमर गुल यांनी अशी कामगिरी केली होती.
तसेच, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सर्वाधिक २०० वेळा वनडे सामन्यात पाच बळी घेतले गेले. त्यानंतर, मेलबर्न येथे १८८ वेळा गोलंदाजांनी पाच किंवा पाचपेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.
फलंदाजीत ही दाखवली चमक
मालिकेतील पहिला सामन्याप्रमाणे या सामन्यातही पाकिस्तानच्या फलंदाजांनी कच खाल्ली. हसन अलीने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत पाकिस्तानी चाहत्यांचे थोडेफार मनोरंजन केले. त्याने केवळ १७ चेंडूत दोन चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ३१ धावा चोपल्या. विशेष म्हणजे त्याने इंग्लंडचा लेगस्पिनर मॅट पार्कीसनला सलग तीन उत्तुंग षटकार खेचले.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडने पाकिस्तानला पुन्हा एकदा पाजले पराभवाचे पाणी, सोप्या विजयासह मालिका घातली खिशात
सूर्यकुमारने निवडला सर्वकालिन आयपीएल संघ, यष्टीरक्षक म्हणून धोनीला नाही, तर ‘या’ खेळाडूला दिले स्थान






