बंगळूरु। आयपीएल 2019 मध्ये बुधवारी 42 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 17 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच या स्पर्धेतील आव्हानही कायम ठेवले आहे.
तसेच या सामन्यात एक गमतीशीर घटनाही प्रेक्षकांना पहायला मिळाली. मैदानावरील पंच चेंडू खिशात ठेवला असल्याचे विसरले होते. पण दुसरा चेंडू मागितल्यावर मात्र त्यांच्या लक्षात आले. याचा व्हिडिओ आयपीएलने अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून एबी डिविलियर्स आणि मार्कस स्टॉयनिस फलंदाजी करत होते. त्यावेळी 15 वे षटक टाकण्यासाठी अंकित राजपूत आला होता. परंतू तो चेंडू कुठेय असे विचारत होता. पण कोणत्याच खेळाडूकडे चेंडू नसल्याने चेंडूची शोधाशोध सुरु झाली.
यावेळी किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनही मैदानावरील पंच शमशुद्दीन यांच्याकडे विचारणा करण्यासाठी आला. तसेच मैदानावरील दुसरे पंच ब्रुस ऑक्सेनफोर्डही तिथे आले. अखेर दुसरा चेंडू मागवण्यात आला.
पण त्यानंतर दाखवण्यात आलेल्या टीव्ही रिप्लेमध्ये दिसले की स्ट्राटर्जिक टाईम आऊटच्या वेळी शमाशुद्दीन यांनी ऑक्सेनफोर्डकडून चेंडू घेऊन खिशात ठेवला होता. नंतर हे लक्षात येताच शमाशुद्दीन यांनी हसत तो चेंडू दाखवला. यानंतर खेळाडूंसह पंचानाही हसू आवरता आले नाही.
या घटनेनंतर काहीवेळाने मात्र सावध खेळणाऱ्या डिविलियर्स आणि स्टॉयनिसने आक्रमक खेळायला सुरुवात केली. या दोघांनी मिळून नाबाद 121 धावांची भागीदारी केली आणि बेंगलोरला 20 षटकात 4 बाद 202 धावांचा टप्पा गाठून दिला.
त्यानंतर 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबला 20 षटकात 7 बाद 185 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना 17 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
https://twitter.com/IPL/status/1121085190841876480
महत्त्वाच्या बातम्या –
–केएल राहुलचा मोठा पराक्रम; रैना, कोहलीलाही जमले नाही ते करुन दाखवले
–सलग तीन विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला बसला सर्वात मोठा धक्का…
–संपूर्ण यादी – असे आहेत २०१९ विश्वचषकासाठी सर्व संघांचे खेळाडू






