भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने तिला कांस्य पदकावर धन्यता मानावी लागेल. या पराभवानंतर ती काहीशी निराश असली तरी, पदक मिळवल्याचे समाधान तिला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर तिने दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले, आता मी महिनाभर सुट्टी घेणार आहे.
लवलीनाचा झाला उपांत्य फेरीत पराभव
उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवल्यानंतर लवलीनाकडून सर्व देशवासीयांना सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेल्लीने तिचा पराभव केला.
या पराभवानंतर बोलताना ती म्हणाली, “मी माझी रणनीती अंमलात आणू शकले नाही, बुसेनाझने वेगवान खेळ केला. मला वाटले की मागच्या पायावर खेळल्याने दुखापत होईल, म्हणून मी आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. मला तिच्या आत्मविश्वासावर हल्ला करायचा होता, पण तसे झाले नाही.”
लवलीना महिला वेल्टरवेट गटात (६९ किलो) ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. ती ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी तिसरी भारतीय बॉक्सर ठरली. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुष बॉक्सर विजेंदर सिंगने तर, २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये दिग्गज मेरी कोमने कांस्यपदक आपल्या नावे केले होते.
आता महिनाभराची सुट्टी घ्यायची आहे
मायदेशी परतल्यानंतर काय करणार? याचे उत्तर देताना तेवीस वर्षीय लवलीना म्हणाली, “मी ८ वर्षे या पदकासाठी मेहनत घेतली आहे. मी घरापासून, कुटुंबापासून दूर राहिले, माझे आवडीचे पदार्थ खाल्ले नाहीत. मात्र, कोणीही असे करू नये असे मला वाटते. मला अशी भीती वाटायची की, जर मी काही चुकीचे केले तर खेळावर त्याचा परिणाम होईल.”
लवलीना पुढे म्हणाली, “मी २०१२ पासून कधीही सुट्टी घेतली नव्हती. आता मला एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त सुट्टी घ्यायची आहे. कुठे जायचे हे अद्याप ठरवले नाही. मात्र, सुट्टी घेण्याचे नक्की केले आहे.”
हे पदक तिच्यासाठीच नव्हे तर, आसामच्या गोलाघाटमधील तिच्या गावासाठीही बदल घडवून आणणारे ठरले. कारण, आता बरो मुखिया या तिच्या गावापर्यंत पक्का रस्ता बांधला जात आहे.
कठीण परिस्थितीवर मात करत पोहोचली ऑलिम्पिकला
नऊ वर्षांपूर्वी बॉक्सिंगमध्ये आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या लवलीनाने दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकची तयारी तिच्यासाठी सोपी नव्हती. कारण, कोरोना संसर्गामुळे ती युरोपला सरावासाठी जाऊ शकली नाही. तसेच तिच्या आईवर याच काळात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची तारिख समजल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट
“तर आर अश्विन त्याचा फॉर्म गमावून बसेल”, मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केली भीती
“पहिल्या कसोटीत भारताला त्या खेळाडूची भासेल कमतरता”, दिग्गज भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया