क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी खेळाडूंमध्ये वाद होतात, तर कधी-कधी काळ लोटल्यानंतर क्रिकेटच्या मैदानातच हे वाद मिटतात. असेच काहीसे मागील वर्षी देशांतर्गत स्पर्धेदरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्यामध्ये चांगलेच वाद झाले होते. त्यानंतर पंड्याने त्याला संघातून बाहेर काढण्याची धमकीही दिली होती. मागील वर्षी हुड्डा बडोदा संघाचा भाग होता. गुजरात क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या ई-मेलमध्ये हुड्डाने पंड्यावर अनेक आरोप लावले होते. हे दोन्ही खेळाडू आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा भाग आहेत.
आयपीएल २०२२मध्ये नव्याने जोडल्या गेलेल्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघात दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि कृणाल पंड्याची (Krunal Pandya) एन्ट्री झाल्यापासून दोघेही चर्चेचे धनी ठरलेत. चाहत्यांना प्रश्न पडला होता की, हे दोन्ही खेळाडू मैदानावर एकमेकांशी चर्चा करतील की नाही. हुड्डा आणि पंड्याच्या मतभेदांवर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आधीच वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, क्रिकेटच्या मैदानावर कामगिरी करण्यासाठी मैत्री गरजेची नाहीये. दोन्ही खेळाडूंना माहितीये की, ते लखनऊ संघात का आले आहेत. दुसरीकडे आता हुड्डा आणि पंड्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्यातील मतभेद दूर होताना दिसत आहेत. हे खुद्द हुड्डानेच सांगितले आहे.
कृणाल पंड्या माझा भाऊ
नुकतेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हुड्डाने पंड्याबद्दलच्या आपल्या नात्याविषयी वक्तव्य केले. त्याला जेव्हा विचारण्यात आले की, संघात कृणाल पंड्या आहे, तेव्हा तो म्हणाला की, “तो माझा भाऊ आहे. भावांमध्ये भांडणं होतच राहतात. आम्ही एका संघात आहोत आणि एका उद्देशासाठी खेळत आहोत.” हुड्डाच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, दोन्ही खेळाडूंमधील मतभेद दूर होऊन त्यांच्यातील जवळीकता वाढत आहे.
आयपीएल २०२२मधील लखनऊ संघाची कामगिरी
आयपीएल २०२२मधील लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्यांना १ सामन्यात पराभव, तर उर्वरित २ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. गुणतालिकेत ते पाचव्या क्रमांकावर आहेत.
लखनऊ संघाचा पुढील सामना गुरुवारी (०८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईच्या डी. वाय. पाटील अकादमी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.






