आयपीएल 2024 च्या शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटसचा सनरायरर्जस हैदराबादविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला होता. या सामन्यात लखनऊनं हैदराबादसमोर 165 धावांचं सन्मानजनक लक्ष्य ठेवलं होतं. परंतु हैदराबादच्या सलामीवीरांनी धावांचा पाठलाग करताना लखनऊच्या गोलंदाजांच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी अवघ्या 9.4 षटकांत हे लक्ष्य गाठलं. हैदराबादनं हा सामना 10 गडी राखून जिंकला. ट्रेव्हिस हेडनं 30 चेंडूत 89 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्यानं 8 चौकार आणि 8 षटकार लगावले. तर अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 75 ठोकल्या, ज्यात 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
या सामन्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांचा एक व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये गोयंका केएल राहुलसोबत रागानं काहीतरी बोलत असल्याचं दिसत होतं. हा व्हिडियो व्हायरल होताच सोशल मीडियावर फॅन्सनं संजीव गोयंका यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
या पराभवानंतर केएल राहुलकडून लखनऊचं कर्णधारपद काढून घेतलं जाईल, अशाही चर्चा होत्या. आता या सर्व चर्चांवर लखनऊच्या टीम मॅनेजमेंटनं स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व अफवा खोट्या असून, उर्वरित सामन्यांमध्ये केएल राहुलकडेच लखनऊच्या संघाचं नेतृत्व असेल, असं मॅनेजमेंटनं स्पष्ट केलं आहे.
आयपीएल 2024 च्या या हंगामात केेएल राहुलनं उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये 460 धावा ठोकल्या असून, यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊनं 12 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून, 6 सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानावर आहे.
लखनऊनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दोन्ही सामन्यात विजय मिळवला. तर राजस्थान राॅयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. तर संघाला केकेआरकडून 98 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करेल, राहुल द्रविड यांचं भविष्य काय?