मुंबई इंडियन्स संघ हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून हार्दिक पंड्याने या संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तो दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकला नव्हता. तसेच फलंदाजीमध्ये देखील त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. ज्यामुळे आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघ त्याला रिलीज करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आयपीएल २०२२ स्पर्धेत असा एक संघ आहे, ज्या संघात हार्दिक पंड्या खेळताना दिसून येऊ शकतो.
आयपीएल २०२२ स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत खेळाडूंचा मोठा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. तर अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ देखील नव्याने स्पर्धेत सहभागी होणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी अहमदाबाद संघावर ७ हजार कोटी इतकी बोली लावण्यात आली आहे.
असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला रिलीज केल्यानंतर अहमदाबाद संघ त्याला आपल्या संघात स्थान देऊ शकतो. हार्दिक पंड्या गुजरातचा असल्यामुळे त्याला या संघात स्थान तर मिळेलच. यासह त्याला या संघाचे कर्णधारपद देखील दिले जाऊ शकते.
माध्यमातील वृत्तांनुसार, अहमदाबाद संघ हार्दिक पंड्यासह केएल राहुल आणि श्रेयस अय्यरला देखील आपल्या संघात स्थान देऊ शकतात. आयपीएल २०२१ स्पर्धेत केएल राहुलने पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व केले होते. तर श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. दोघेही खेळाडू आपआपली फ्रेंचायजी सोडण्याच्या तयारीत आहेत. केएल राहुलने आयपीएल २०२१ स्पर्धेत ६०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तर श्रेयस अय्यर दुखापतीतून परतला होता. तरीदेखील त्याला कर्णधारपद देण्यात आले नव्हते. त्याच्याऐवजी रिषभ पंतला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते.
तसेच डेविड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्याने पुन्हा एकदा नवीन सुरुवात करण्याची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे अनुभवी डेविड वॉर्नरला लखनऊ संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. यासह उपकर्णधार म्हणून भुवनेश्वर कुमार किंवा सुरेश रैनाला देखील संधी दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
मागच्या बाजूने धावत जात वोक्सचा भन्नाट एकहाती झेल; व्हिडिओ पाहून कौतुकाने वाजवाल टाळ्या
आयपीएल २०२२ मध्ये ४ खेळाडूंना रिटेन केल्यास फ्रँचायजींना मोजावे लागणार ‘इतके’ कोटी, वाचा