---Advertisement---

हैदराबादचे पराभवाचे सत्र सुरूच, राहुलसेनेचा 5 विकेट्सने दणदणीत विजय; लखनऊ संघ गुणतालिकेतील टॉपर

On: शुक्रवार, एप्रिल 7, 2023 10:51 PM
KL-Rahul-And-Krunal-Pandya
---Advertisement---

शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा नववा सामना लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघ आमने-सामने होते. हा सामना केएल राहुल याच्या नेतृत्वातील लखनऊ संघाने 5 विकेट्सने आपल्या नावावर केला. हा लखनऊचा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. यासह लखनऊने गुणतालिकेतही अव्वल स्थान मिळवले. या विजयात कर्णधार राहुल आणि कृणाल पंड्याने मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाच्या गोलंदाजांनी सपशेल चुकीचा ठरवला. यावेळी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत फक्त 121 धावाच केल्या. हैदराबादचे 122 धावांचे आव्हान लखनऊ संघाने 16 षटकात 5 विकेट्स गमावत 127 धावा चोपत पूर्ण केले. तसेच, 5 विकेट्सने सामना खिशात घातला.

https://twitter.com/LucknowIPL/status/1644390377913462784

लखनऊ संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 31 चेंडूत 35 धावा केल्या. या धावा करताना त्याने 4 चौकार मारले. त्याला कृणाल पंड्या याची साथ मिळाली. राहुल आणि पंड्यामध्ये 55 धावांची भागीदारी केली. कृणालने 23 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त काईल मेयर्स (Kyle Mayers) 13, निकोलस पूरन नाबाद 11, मार्कस स्टॉयनिस नाबाद 10 आणि दीपक हुड्डा 7 धावांचे योगदान दिले. लखनऊसाठी पदार्पण करणाऱ्या रोमारियो शेफर्ड याला भोपळाही फोडता आला नाही. तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावा करत तंबूत परतला.

यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना तीन गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यात फजलहक फारुकी, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांचा समावेश होता. यांच्याव्यतिरिक्त आदिल रशीद याने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हैदराबाकडून राहुल त्रिपाठी याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 41 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त अनमोलप्रीत सिंग याने 31 धाव, अब्दुल समद नाबाद 21 धावा आणि वॉशिंग्टन सुंदर याने 16 धावा केल्या. या खेळाडूंशिवाय पाच फलंदाजांना 10 धावांचा आकडाही पार करता आला नाही. यातील दोन जण शून्य धावेवर बाद झाले. यात मार्करम याचाही समावेश होता. मार्करमने 1 चेंडू खेळत शून्य धाव केली आणि तंबूचा रस्ता पकडला.

यावेळी लखनऊकडून गोलंदाजी करताना कृणाल पंड्या याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 18 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त 40 व्या वर्षी लखनऊसाठी पदार्पण करणाऱ्या अमित मिश्रा (Amit Mishra) याने 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनीही प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.

या विजयासह लखनऊ गुणतालिकेत भरारी घेतली आहे. त्यांचे 4 गुण असून त्यांनी अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. लखनऊचा पुढील सामना 10 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे. (Lucknow Super Giants won by 5 wkts against Sunrisers Hyderabad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादचा नवीन कर्णधार पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद, स्वत:लाही बसेना विश्वास, पाहा व्हिडिओ
लखनऊची ताकद वाढली! IPLमध्ये दीडशेहून अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय धुरंधराचे संघाकडून पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---