इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्यात प्लेऑफ सामने खेळले जात आहेत. प्लेऑफमधील एलिमिनेटर सामना बुधवारी (२५ मे) कोलकात्यात झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लखनऊ सुपरजायंट्सला १४ धावांनी पराभवाची धूळ चारली. यासह लखनऊ संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. या सामन्यानंतर लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल याने संघाच्या पराभवामागचे कारण सांगितले आहे.
राहुलने (Captain KL Rahul) संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाला पराभवासाठी जबाबदार (Reason Of Defeat) धरले आहे. लखनऊच्या खेळाडूंनी बेंगलोरच्या फलंदाजीदरम्यान ४ झेल सोडले. यातील ३ झेल रजत पाटीदारचे होते, ज्याने या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. तर एक झेल दिनेश कार्तिकचा होता.
तो म्हणाला की, “मला वाटते आमच्या पराभवामागचे कारण अगदी स्पष्ट आहे. आम्ही मैदानावर उतरलो खरे, परंतु आम्ही क्षेत्ररक्षणात मार खाल्ला. आमच्या खेळाडूंनी सोपे झेल सोडले. कधीही सामन्यात झेल सुटल्याने मदत मिळत नाही. वास्तवात बेंगलोर संघाने चांगले क्षेत्ररक्षण केले, परंतु आम्ही क्षेत्ररक्षणात कमी पडलो. तसेच रजत पाटीदारच्या शतकाने आम्हाला विजयापासून दूर नेले. जेव्हाही वरच्या ३ पैकी एखादा फलंदाज शतक करतो, तेव्हा अधिकतर संघ विजयी होतात.”
पुढे लखनऊ संघ आगामी हंगामात दमदार पुनरागमन करेल, असा विश्वासही राहुलने व्यक्त केला. तो म्हणाला की, “आम्ही या हंगामातून खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी घेऊ. ही एक नवीन फ्रँचायझी आहे. आम्ही खूप साऱ्या चूका केल्या आहेत आणि प्रत्येक संघाकडून अशा चुका होतात. पण आता आम्हाला आणखी मजबूत होऊन पुनरागमन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा एक युवा संघ आहे, जो त्यांच्या चुकांमधूनच शिकेल. आता आम्ही घरी परत जाऊ, अजून सक्षम खेळाडू बनण्याचा प्रयत्न करू.”
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना रजत पाटीदारच्या नाबाद ११२ धावांच्या खेळीच्या जोरावर बेंगलोरने ४ विकेट्स गमावत २०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघाला ६ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावाच करता आल्या. हा सामना जिंकत बेंगलोरचा संघ क्वालिफायर २ मध्ये पोहोचला आहे. या सामन्यात त्यांची भिडंत राजस्थान रॉयल्सशी होईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रजत पाटीदारला कृणालच्या ‘त्या’ षटकातच आला शतक करण्याचा कॉन्फिडन्स, वाचा त्याची प्रतिक्रिया
एलिमिनेटरचा वाईट इतिहास पुसत बेंगलोरची क्वालिफायर २मध्ये ‘रॉयल’ एन्ट्री, विजयाचा जल्लोष बघण्यासारखा
वाढदिवस विशेष: कारकिर्दीत अनेक वादळे येऊनही नरीन आपली ‘मिस्ट्री’ टिकवून आहे