कलकत्ता-प.बंगाल येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू झालेल्या “४५व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. आज महाराष्ट्राच्या मुलींनी ड गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडीसाचा ४०-१९ असा पराभव करीत या गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली.
पूर्वार्धात १ लोण देत महाराष्ट्राने २३-०९ अशी भक्कम आघाडी राखली होती. या मोठ्या आघाडी मुळे प्रशिक्षिका वीणा खवळे (शेलटकर) हिने आपल्या राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी दिली. उत्तरार्धात आणखी १ लोण देत हा सामना मोठ्या फरकाने जिंकला.
सोनाली हेळवी, प्रतीक्षा तांडेल यांच्या दमदार चढाया त्याला साक्षी रहाटेच्या पकडीची मिळालेली मजबूत साथ यामुळे हा विजय सोपा गेला.
महाराष्ट्राच्या मुलांनी देखील क गटात हिमाचल प्रदेशचा ३५-३१ असा पराभव करीत या गटात अव्वल क्रमांक पटकावित बाद फेरी गाठली. पूर्वार्धात एक लोण देत २२-०९ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरार्धात हिमाचलने चांगलेच झुंजवले. लोणची परतफेड करीत हिमाचलने महाराष्ट्राची आघाडी कमी करीत आणली. पण मोक्याच्या क्षणी महाराष्ट्राचे प्रशिक्षक आयुब पठाण व लक्ष्मण गावंड यांनी खेळाडूंना सामना शांतपणे खेळण्यास प्रवृत्त करीत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.
पंकज मोहिते, असलम इनामदार यांचा अष्टपैलू खेळ त्याला शुभम शेळके, सौरभ पाटील यांची मिळालेली चढाईची साथ यामुळे हा विजय मिळविता आला. महाराष्ट्राचा बचाव उत्तरार्धात दुबळा ठरला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी गटात विजय मिळवत बादफेरीत प्रवेश मिळवला आहे.