पुणे : मॉडर्न पेंटॅथलॉनच्या आठव्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने चांगली सुरवात केली. वरिष्ठ, युवा आणि कुमार अशा तीनही विभागात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व राखून सलग आठव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळविण्याच्या दृष्टिने भक्कम पाऊल टाकले. स्पेनमध्ये होणाºया जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी भारताचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार असल्यामुळे स्पर्धेत चांगलीच चुरस दिसून आली. मात्र, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली मक्तेदारी कायम राखली.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन एशियन मॉडर्न पेंटॅथलॉनचे सचिव आणि इंडियन आॅलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनिस, हर्षद इनामदार, सायली ठोसर, शंकर माडगुंडी उपस्थित होते.
वरिष्ठ विभागात पुरुषांमध्ये गतविजेत्या विराज परदेशी याने ८०० मीटर धावणे आणि १०० मीटर जलतरण प्रकारात अग्रस्थान राखताना २४ मिनिटे ४५.७२ सेकंद अशी वेळ दिली. कुमार विभागात मुलांमध्ये पहिले तीनही क्रमांक महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मिळविले. यामध्ये अजिंक्य बालवडकर याने १९ मिनिट ३९.३४ सेकंद अशी वेळ देत बाजी मारली. सौरभ पाटील, आणि सुरज रेणुसे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.
युवकांच्या ई विभागात पुरुषांमध्ये महाराष्ट्राला शह बसला. राजस्थानच्या हेमंत कुमार याने ६ मिनिट १४.८३ सेकंद अशी सरस वेळ देत सुवर्णपदक जिंकले. त्याचाच संघ सहकारी राज जटावत दुसºया, तर महाराष्ट्राचा अबीर धोंड तिसºया स्थानावर राहिला. याच विभागात महिलांमध्ये मात्र, तीनही क्रमांक महाराष्ट्राने मिळविले. अनुभवी वैष्णवी अहेर हिने ६ मिनिट २५.०२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक पटकावले. रुजुता कुलकर्णी, विधिका परमार दुसºया आणि तिसºया स्थानावर राहिल्या.
युवकांच्या सी विभागातही महिलांचे वर्चस्व कायम होते. जुई घम हिने १५.२६.२७ सेकंद अशी वेळ देताना पहिला क्रमांक मिळविला. पाठोपाठ सायली गंजाळे, गीता मालुसरे या दुसºया आणि तिसºया क्रमांकावर आल्या. डी विभागातही फारसे वेगळे चित्र नव्हते. मुग्धा वाव्हळ (७ मिनिट ५२ सेकंद) हिने पहिला क्रमांक मिळविला. महाराष्ट्राच्याच मनाली रत्नोजी आणि दिव्या मारणे यांनी रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. ब विभागात आदिती पाटील हिने २० मिनिट ४०.४६ सेकंद अशी वेळ देताना महाराष्ट्राचे वर्चस्व कायम राखले. साक्षी सली ही दुसरी आली. उत्तर प्रदेशाच्या खुशी सैनी हिने तिसरे स्थान मिळविले.
युवकांच्या विभागात पुरुषांमध्ये महाराष्ट्राला राजस्थानने झुंज दिली. मात्र, त्यांचे प्रयत्न कमी अधिक प्रमाणात तोकडे पडले. ब विभागात महाराष्ट्राचा पार्थ खराटे (१७ मिनिट ५७.५५ सेकंद) विजेता ठरला. राजस्थानचा जितेंद्र धायल दुसरा, तर महाराष्ट्राचा देवेश जंगम तिसरा आला. सी विभागात राजस्थानच्या सुनील ठक्करने १३ मिनिट ४७.६० सेकंद वेळेसह सुवर्ण, तर बलबीर सिंगने कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राचा प्रसाद भार्गव रौप्यपदकाचा मानकरी ठरला. ड विभागात अर्जुन अडकर आणि वेदांत गोखले यांनी अनुक्रमे पहिला दुसरा क्रमांक मिळविले. अर्जुनने ७ मिनिट ५.८० सेकंद अशी वेळ दिली. आंध्रचा एम. आदर्श कांस्यपदकाचा मानकरी ठरला. कुमार गटात मुलींमध्ये महाराष्ट्राला अपयश आले. उत्तर प्रदेशाच्या सृष्टी बाणेरी हिने ३४ मिनिट ७.५० सेकंद वेळ देताना पहिले स्थान मिळविले. आंध्रची के. रेवती दुसरी आली. युवकांच्या अ विभागात राजस्थानच्या जया शेखावत हिने बाजी मारली.