५ हजार मुलांनी, त्याबरोबर अनेक फुटबॉलप्रेमींनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद
पुणे : महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ हा बहुउद्देशीय उपक्रम शुक्रवारी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात ३५ शाळांमधील किमान ५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्याचबरोबर सलग दहा तास फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशनच्या (फिफा) वतीने ६ ते २८ ऑक्टोबरच्या दरम्यान १७ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंमध्ये खेळाची आवड निर्माण होवून अधिकाधिक खेळाडूंनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला आमदार मेधा कुलकर्णी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी फुटबॉलला कीक मारून या उपक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी आयुक्त सुनील केंद्रेकर, सहसंचालक नरेंद्र सोपल, उद्योजक राजेश पांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू कृष्णकुमार राणे, पूजा घाटकर, तेजस्विनी सावंत, दीपाली शिलदनकर, निन ढोरजी, पुणे मनपा शिक्षण विभाग क्रीडाप्रमुख राजेंद्र ढुमने, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) डॉ. गणपतराव मोरे, आप्पा बाळवडकर, गणपत बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, लहान वयात मुलांना खेळाची आवड निर्माण व्हायला हवी. पालकांनी मुलांना खेळण्यासाठी मैदानावर पाठवावे. मोबाइलच्या जगातून बाहेर येऊन मुलांनीही मैदानावर घाम गाळावा. अधिकाधिक मुलांना फुटबॉलची आवड निर्माण व्हावी आणि खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपल्या शहराचे, राज्याचे, देशाचे नाव उंचवावे.
या खेळात सहभागी होणाऱ्या फुटबॉल क्लब्स, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने फुटबॉल देण्यात आले. दरम्यान, शिवछत्रपती क्रीडानगरीत सलग दहा तास फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात एका संघात पाच खेळाडूंचा सहभाग होता. एकूण १२ मैदाने तयार करण्यात आली होती. १२ मैदानांसाठी १२ क्रीडा मार्गदर्शक मैदान प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांना सहायक म्हणून ६ खेळाडू नियुक्त केले होते. या वेळी मैदानावर उपस्थित सर्व खेळाडूंसाठी चॉकलेट, चहा, नाष्टा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर कोणाला दुखापत झाल्यास वैद्यकीय सुविधाही तयार ठेवण्यात आल्या होत्या.
त्याचबरोबर हाउसकिपिंग, सिक्युरिटीचे कर्मचारी, संकुलामधील विविध खेळांच्या अकॅडमीतील खेळाडू, नागरीक यांच्याही स्पर्धा झाल्या. स्पर्धेसाठी २४ पंचांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व फुटबॉलप्रेमींनी या उपक्रमाचा आनंद लुटला. शहरातील विविध शाळांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. अनेक जण पहिल्यांदा या खेळाचा आनंद लुटत होते. तर काहींनी आपल्यातील फुटबॉलचे कौशल्यही दाखविले. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूही या उपक्रमाने भारावले होते. पुण्यात मोठ्या प्रमाणावर फुटबॉलप्रेमी असून, त्यांना या उपक्रमामुळे निश्चित प्रोत्साहन मिळेल, अशी भावना या खेळाडूंनी व्यक्त केली.