पुणे : महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख यांनी आपापल्या प्रतीस्पर्ध्याना पराभूत करताना महाराष्ट्र केसरीच्या माती गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिकंदर शेख समोर बाला रफिक शेखचे तर महेंद्र गायकवाड समोर शुभम शिदनाळेचे आव्हान असणार आहे.
माती विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी ‘उपमहाराष्ट्र केसरी’ असणारा लातूरच्या शैलेश शेळकेला सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने ५-२ असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाडने शैलेश शेळकेवर ताबा घेताना दोन गुण वसूल केले. शैलेश शेळकेने त्यानंतर नकारात्मक कुस्ती केल्याने पुन्हा एका गुण महेंद्र गायकवाडला देण्यात आला. महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत ३ -१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत शैलेशवर ताबा मिळवत महेंद्र गायकवाडने पुन्हा २ गुणांची कमाई केली. त्यानंतर शैलेशने एक गुण मिळवला परंतू विजय साकारण्यात अपयशी ठरला.
कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेने सांगलीच्या संदीप मोटेला ४ – ० असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. शुभमने पहिल्याच फेरीत पहिल्याच प्रयत्नात एका गुणाची कमाई केली. मात्र यावेळी नाकाला जखम झाली असताना देखील संदीप कुस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा शुभमने संदीपला बाहेर ढकलत एक गुण वसूल केला. शुभमने पहिल्या फेरीत २ मिळवून आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत शुभमने दमदार खेळ करताना कटऑफ करताना २ गुण परत मिळवताना लढत जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
वाशीमच्या सिकंदर शेखने मुंबईच्या विशाल बनकरला १०-० असे एकतर्फी पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. पहिल्या फेरीत सिकंदर शेखने काही सेकंदातच ताबा मिळवताना २ पुन्हा ताबा घेतना २ अशी पहिल्या मिनीटाच ४ गुणांची कमाई केली. विशाल बनकर देखील आक्रमक चाली रचण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सिकंदरने प्रत्येक विशालच्या डावाला दमदार प्रत्युतर देताना विशालला गुण मिळू दिले नाहीत. यानंतर सिकंदरने भारंदाज डाव टाकताना थेट चार गुणांची कमाई करताना आपली बढत ८-० अशी वाढवली. दुसऱ्या डावात सिकंदरने तांत्रिक २ गुण मिळवत विजय साकारला.
जालन्याचा माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने आपल्या नावाला साजेसा खेळ करताना कोल्हापूरच्या अरुण बोंगार्डेला ७-० असे पराभूत करताना उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. रफिकने पहिल्याच प्रयत्नात कटऑफ करताना २ गुण कमावले. त्यानंतर बाला रफिकने भारंदाज डाव टाकत पुन्हा २ गुण मिळविले. यानंतर बाला रफिक शेखने संयमी कुस्ती करताना पुन्हा एकदा अरुण बोंगार्डेचा ताबा घेताना २ गुण मिळविले. पहिल्याच फेरीत बाला रफिक शेखने ६ -० अशी आघाडी मिळविली. दुसऱ्या फेरीत अरुण बोंगार्डेने लढत देत गुण मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याला यश मिळाले नाही. मात्र बाला रफिकने तांत्रिक एक गुण मिळविताना ७-० असे मैदान मारले.
गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने वाशीमच्या वैभव मानेला ५-० असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. याच विभागातून पुण्याच्या तुषार डुबेने सोलापूरच्या अक्षय मंगवडेला २-० असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या लढतीत हिंगोलीच्या गणेश जगतापने सांगलीच्या सुबोध पाटीलला ५-० असे पराभूत करताना उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. चौथ्या लढतीत शिवराज राक्षेने माऊली कोकाटेला १० -० असे एकतर्फी पराभूत करताना महाराष्ट्र केसरी गटाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईस्ट बंगाल एफसीचे आव्हान संपल्यात जमा; पिछाडीवरून जमशेदपूर एफसीचा विजय
BREAKING: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्या-किशन प्रथमच कसोटी संघात