-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )
सरत्या वर्षाला निरोप देत असताना सार्या राज्यभर महाराष्ट्र केसरीचे पडघम वाजू लागतात. तालुका-जिल्हा निवड चाचणीत गावोगावी मल्ल मैदाने गाजवितात. अवघा महाराष्ट्र कुस्तीमय झालेला दिसतो. दक्षिण महाराष्ट्रातील तालमीत एकच चर्चा रंगते – यंदा मानाची गदा कोण जिंकणार ? कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी चांदीची गदा कोण पटकविणार ? दिवाळी संपताच महाराष्ट्राचे कुस्तीविश्व महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे तेजोमय होण्यास प्रारंभ होतो. नवा जोम, नवा जोश घेऊन राज्यातील मल्ल केसरी स्पर्धेसाठी घाम गाळत असतात. महाराष्ट्राचे कुस्तीक्षेत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेने ढवळून निघते. 42 संघाच्या 800 पेक्षा अधिक कुस्तीगिरांच्या चीतपट, चिवट आणि शर्थीच्या झुंजी याच स्पर्धेत दिसून येतात. तालुका, जिल्हा या प्राथमिक स्तरापासून आपल्या विजेतेपदाची पताका फडकवित मल्ल मानाच्या गदाचा मानकरी ठरत असतो. ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद विजेत्याला होतोच परंतु त्याला मिळणारा मानही कणभर ऑलिम्पिक विजेत्यापेक्षा जास्त असल्याने आपल्या कुस्ती कारकीर्दीत केसरीचं स्वप्न प्रत्येक कुस्तीगीरचं असतं.
पुण्यात 1953 मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना होताच महाराष्ट्रातील अजिंक्य मल्ल ठरविण्यासाठी एक स्पर्धा भरविण्याचा विचार कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या मनात वर्षभर घोळत होता. जेव्हा मुंबई येथे 1955 मध्ये दुसरे अधिवेशन झाले तेव्हाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू करण्याचे ठरविले. विजयी पैलवानाला महाराष्ट्र केसरी अशी पदवी व मानचिन्ह म्हणून चांदीची गदा बहाल करावी हेही ठरले. सर्वात शेवटी महाराष्ट्र केसरीची कुस्ती घेण्याचे घोषित झाले. मैदानात कोणास महाराष्ट्र केसरी पदासाठी सलामी द्यावयाची असेल तर यावे असे आवाहन करण्यात आले. त्याकाळी नावाजलेले मल्ल विष्णू नागराळे आणि शामराव मुळीक यांच्यात पहिली महाराष्ट्र केसरीची झुंज होणार होती. परंतु मुळीक यांनी मला एक महिन्याची मुदत द्यावी असे सांगितल्याने महाराष्ट्र केसरीचा पहिलाच प्रयत्न सफल होऊ शकला नाही. तरीही परिषदेने दोन्ही पैलवानांना कुस्ती ठरल्याबद्दलची मैदानात सलामी द्यावी असे सांगितले. त्याप्रमाणे ती सलामी हजारो प्रेक्षकांसमोर घेतली गेली. ज्या वर्षी पहिली महाराष्ट्र केसरीची ऐतिहासिक कुस्ती होणार त्याच 1956 वर्षी विष्णू नागराळे यांचे निधन झाले. यामुळे नियोजित कुस्ती रद्द झाली. तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्याचा परिषदेचा मनसुबाही मागे पडला. 1959 पासून हिंदकेसरी स्पर्धा सुरू झाली आणि पहिलीच मानाची गदा कुस्तीपंढरीच्या श्रीपती खंचनाळे यांनी जिंकण्याचा महापराक्रम केला. याच वर्षी सांगली येथे झालेल्या अधिवेशनात पुन्हा एकदा हिंदकेसरीप्रमाणेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले.
नागपूर येथे 1960 साली महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे पाचवे अधिवेशन मोठ्या थाटामाटात पार पडले. गतवर्षी निश्चित केल्याप्रमाणे नागपूर अधिवेशनात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लढतीही झाल्या. केसरी पदासाठी कोल्हापूरचे हुंचकट्टी आणि सांगलीचे लक्ष्मण काकती यांची चुरशीची कुस्ती झाली. ठरलेल्या वेळेत समसमान गुण मिळाल्यामुळे जादा वेळ देऊन कुस्ती खेळविण्यात आली. जादा वेळेतही कुणीच कुणावर मात करू शकला नाही. कुस्तीचा निकाल बरोबरीने लागल्यामुळे गदा कुणालाच दिली गेली नाही. पुढच्याच वर्षी 1961 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या अधिवेशनापासून सांगलीच्या दिनकर दह्यारी यांनी चीतपट कुस्ती करून महाराष्ट्र केसरी अजिंक्य परंपरेचा महाराष्ट्र भूमीत श्रीगणेशा केला.
महाराष्ट्र केसरीचा पहिला मान विष्णु नागराळे यांनाच 1955 मध्ये मिळाला असता. तरीही त्यांच्याच तालमीतील, त्यांच्याच शिष्यानेही पहिली गदा शाहूपुरी तालमीत आणून कुस्तीपंढरीची शान वाढविली. दह्यारीच्या केसरीपदानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेची प्रतिष्ठा स्पर्धागणिक उंचावत गेली. गेल्या 62 वर्षात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक बदल झाले.
(प्रा. संजय दुधाणे लिखित महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकातून हा लेख घेण्यात आला असून महाराष्ट्र केसरी २०१८ स्पर्धेच्या काळात या पुस्तकातील कुस्तीवरील सर्व भाग प्रसिद्ध केले जाणार आहेत.)
महत्त्वाच्या बातम्या:
–महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
–आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन
–७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं
–माझं धोनीबद्दलचं मत कधीच बदलणार नाही- गौतम गंभीर