महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी (दि. 22 जून) क्रिकेटप्रेमींना डबल हेडर सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. दिवसातील पहिला आणि स्पर्धेतील 11वा सामना छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघात दुपारी 2 वाजता पुण्याच्या गहुंजी स्टेडिअमवर पार पडणार आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी 1.30 वाजता उभय संघात नाणेफेक होईल. या सामन्याविषयी सर्व माहिती आपण जाणून घेऊयात…
स्पर्धेतील कामगिरी
छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स (Chhatrapati Sambhajinagar Kings vs Kolhapur Tuskers) हे संघ गुरुवारी एमपीएल 2023 (MPL 2023) स्पर्धेतील वैयक्तिक चौथा सामना खेळतील. यापूर्वी छत्रपती संभाजी किंग्स (Chhatrapati Sambhajinagar Kings) संघाने खेळलेल्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात त्यांना ईगल नाशिक टायटन्स संघाने 4 धावांनी पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने 7 विकेट्सने दारुण पराभव केला होता. तसेच, तिसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाकडून 17 धावांनी पराभवाचा धक्का बसला होता. अशाप्रकारे छत्रपती संघाने तिन्ही सामने गमावले असून ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. आता छत्रपती संघ चौथ्या सामन्यात पुनरागमन करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. छत्रपती संभाजी किंग्स संघाची धुरा राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) याच्याकडे आहे.
दुसरीकडे, केदार जाधव (Kedar Jadhav) याच्या नेतृत्वातील कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघ तीनपैकी 1 सामन्यात पराभव, तर 2 सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाला. पहिल्या सामन्यातच पुणेरी बाप्पाने कोल्हापूरला 8 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर कोल्हापूरने पुढील दोन्ही सामन्यात अनुक्रमे रत्नागिरी जेट्सविरुद्ध 4 विकेट्सने आणि सोलापूर रॉयल्सविरुद्ध 26 धावांनी विजय मिळवला होता. आता चौथ्या सामन्यात कोल्हापूर संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सामन्याविषयी सर्वकाही
छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघात स्पर्धेचा 11वा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येणार आहे, तर डिजिटलवर हा सामना फॅनकोड ऍपवर पाहता येईल. तसेच, या सामन्याचा स्कोरकार्ड फॅनकडोसह स्पोर्ट्स टायगर या वेबसाईटवरही पाहता येईल.
दिवसातील दुसरा सामन्यात ‘हे’ संघ आमने-सामने
स्पर्धेचा 12वा सामनाही गुरुवारीच पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स (Puneri Bappa vs Solapur Royals) संघात खेळला जाणार आहे. पुणेरी बाप्पा सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी, तर सोलापूर रॉयल्स तिन्ही पराभवांसह शेवटच्या स्थानी आहे. (maharashtra premier league 2023 Chhatrapati Sambhajinagar Kings vs Kolhapur Tuskers 11th match preview)
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! वर्ल्डकप क्वालिफायर सामन्यानंतर ‘या’ स्टेडिअमला आग, ICCने उचलले मोठे पाऊल
TNPLमध्ये अश्विनच्या संघाचा अवघ्या 1 धावेने विजय, वरुण चक्रवर्तीची घातक गोलंदाजी ठरली फायद्याची