---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा लिलाव उत्साहात, सोलापूर रॉयल्सकडून नौशाद शेखला सर्वाधिक किंमत

---Advertisement---

पुणे – महाराष्ट्राच्या माजी रणजी कर्णधार नौशाद शेखला महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावात सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळाली. सोलापूर रॉयल्स संघाने नौशाद वर ४लाख २०हजार रूपयांची बोली लावली. कोल्हापूर टस्कर्स संघाने गेल्यावर्षी नौशादवर सहा लाखांची सर्वोच्च बोली लावली होती. मात्र, गेल्या मोसमात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. आजच्या लिलावात खरेदी केला जाणारा तो पहिला खेळाडू ठरला.

अधिक माहिती देताना एमपीएलचे चेअरमन सचिन मुळ्ये म्हणाले की, २०२४ या वर्षाची महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा २जुन पासून गहुंजे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर होणार आहे. स्पर्धेचा गेल्या वर्षीचा मौसम प्रचंड यशस्वी ठरला. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना महत्वाचे व्यासपीठ मिळाले. यंदाच्या स्पर्धेमुळेही महाराष्ट्रातील क्रिकेट नव्या उंचीवर पोहोचेल. यंदाचे स्पर्धेचे जिओ सिनेमा आणि स्पोर्टस १८ वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी यंदाच्या लिलावात एकूण ३११ खेळाडूंमधून ७२खेळाडूंची एकूण ६७.०५लाख रुपयांना विविध संघांनी खरेदी केली. या खेळाडूंची विभागणी ए ग्रेड(मुळ किंमत ६००००), ग्रेड बी (४००००रुपये), ग्रेड सी(२००००रुपये) अशी करण्यात आली होती. २५ वर्षीय यष्टीरक्षक व फलंदाज अनिकेत पोरवाल याचा अ गटात समावेश होता. पुनीत बालन ग्रुपयांच्या मालकीच्या कोल्हापूर टास्कर्स संघाने अ गटातील सर्वोच्च ३लाख ५० हजार रुपयांची बोली लावून त्याला खरेदी केले. क गटातही सर्वोच्च बोली लावताना कोल्हापूर संघाने डावखुरा फिरकी गोलंदाज यश खळदकर याला २लाख ७हजार रुपये किंमतीला खरेदी केले. कोलकत्ता नाईट रायडर्स आणि सहारा पुणे वॉरियर्स या संघांसाठी खेळलेल्या अनुभवी श्रीकांत मुंढेला कोल्हापूर संघाने ३लाख रुपयांना खरेदी केले.

यंदाच्या वर्षी रणजी पदार्पण करणारा रामकृष्ण घोष तिसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला. पुणेरी बाप्पा संघाने ३लाख ४०हजार रुपयांना खरेदी केले. पुणेरी बाप्पा संघानेच यष्टीरक्षक साहिल औताडे (१.९लाख), आणि रोहन दामले(१.३लाख) या खेळाडूंनाही खरेदी केले.

गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने वैभव चौगुलेला खरेदी केल्यानंतर महाराष्ट्राचा डावखुरा गोलंदाज सत्यजित बच्चावला ६००००मुळ किंमतीला खरेदी केले. तर, नाशिक टायटन्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीला यंदाचा आयकॉन प्लेअर म्हणून निवडले. वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमुख (३लाख), फलंदाज रणजीत निकम(२.२लाख) हे नाशिक संघाने घेतलेले सर्वात महागडे खेळाडू होते.

एकूण १४.०६लाख रुपये रक्कम घेऊन उतरलेल्या सोलापूर रॉयल्स संघाने मनोज इंगळे(२लाख), सिध्देश वीर(१.८लाख), रवी झांगड (१.२लाख) यांची खरेदी करताना एकूण ३० खेळाडूंचा संघ पूर्ण केला. छत्रपती संभाजी किंग्स संघाने १९ वर्षाखालील भारतीय संघातील दिग्विजय पाटील(१.४लाख) आणि प्रणय सिंग (१.३लाख) यांना खरेदी करताना सर्वात महागडी बोली लावली.

एमसीएचे मानद सचिव ऍड. कमलेश पिसाळ, एमसीएच्या कार्यकरिणी समितीतील सदस्य या लिलाव प्रसंगी उपस्थित होते. एमसीएचे सहसचिव संतोष बोबडे यांनी आभाप्रदर्शन केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---