---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे सर्वसामान्य कुटुंबातील गुणवान खेळाडूंना संधी – रोहित पवार

On: शनिवार, मे 24, 2025 9:59 PM
---Advertisement---

नाशिक, दिनांक २४ मे, २०२५ : आज नाशिक येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स या संघाचाही समावेश असणार आहे. या फ्रेंचायसी टी-२० स्पर्धांमागची भूमिका, नवोदित खेळाडूंना मिळणारी संधी, संघमालकांची भूमिका, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम, राज्यामध्ये क्रिकेटच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होत असलेले प्रयत्न या विषयांवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ईगल नाशिक टायटन्स या संघाच्या सरावासाठी होम ग्राउंड म्हणून श्री. विनोद यादव यांच्या क्रीडॅक सेंटर फॉर क्रिकेट एक्सलन्स या मैदानाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित दादा पवार यांनी यावेळी पत्रकारांना संबोधित केले.

महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव ॲड. कमलेश पिसाळ, एमपीएल चेअरमन सचिन मुळे, अपेक्स कौन्सिल सदस्य सुशील शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजिंक्य जोशी, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा, सचिव समीर रकटे, ईगल नाशिक टायटन्स संघमालक हितेश सोलंकी, तसेच मेंटर समद फल्ला, कोच हर्षद खडीवाले, आयकॉन खेळाडू साहिल पारख तसेच जिल्हा संघटनेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री. रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. सर्व संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चेअरमन धनपाल शहा व सचिव समीर रकटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व कमिटी नाशिक क्रिकेटच्या विकासासाठी उत्तम प्रयत्न करत आहेत, या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या साथीने नाशिक जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत व भविष्यात आपल्याला सकारात्मक बदल झालेले दिसतील, हा आम्हाला विश्वास आहे. आज नाशिक मधील अनेक महिला व पुरुष खेळाडू विविध वयोगटांसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एमपीएल व डब्ल्यूएमपीएलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून व पुढे जाऊन देशासाठी खेळतील. नाशिकच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी सर्व नाशिककर क्रिकेट रसिकांनी स्टेडियमवर यावे व संघाला व एमपीएल च्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करावे, ही विनंती.”

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरु करणार असून ही अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरु करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्रात चार विभागीय अकादमी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होणार आहे. नाशिक मधून अनेक गुणवान खेळाडूंसोबत अनेक दर्जेदार कोचेस, अंपायर्स व स्कोअरर्सही मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.

या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली.

या हंगामात एमपीएल मध्ये ६ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) व स्टार स्पोर्ट्स २ (Star Sports 2) या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

एमपीएल २०२५ सहभागी संघ:

  1. 4S पुणेरी बाप्पा
  2. PBG कोल्हापूर टस्कर्स
  3. रत्नागिरी जेट्स
  4. ईगल नाशिक टायटन्स
  5. सातारा वॉरियर्स
  6. रायगड रॉयल्स

डब्लूएमपीएल २०२५ सहभागी संघ

  1. पुणे वॉरियर्स
  2. रत्नागिरी जेट्स
  3. सोलापूर स्मॅशर्स
  4. रायगड रॉयल्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---