देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम १७ सुरुवातीपासून भारतातील विविध शहरांमध्ये सुरू झाला. साखळी फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने आसाम संघाचा एक डाव व ७ धावांनी पराभव केला. या विजयासह महाराष्ट्राने दोन वर्षानंतर सुरू झालेल्या रणजी हंगामाची सुरुवात विजयाने केली. अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छाव याने धारदार गोलंदाजी करत महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
रोहतक येथील बन्सीलाल क्रिकेट स्टेडियममध्ये एलिट गट जी मधील या सामन्यात आसाम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रासाठी या सामन्यात पवन शहा, यश नाहर व दिव्यांग हिंगणेकर यांनी रणजी पदार्पण केले. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या अनुपस्थितीत पवन व यश या जोडीने महाराष्ट्रासाठी सलामी दिली. पवन शहा याने आपले रणजी पदार्पण संस्मरणीय करत पहिल्याच डावात २१९ धावांची द्विशतकी खेळी साकारली. त्याव्यतिरिक्त सत्यजित बच्छाव याने अर्धशतकी खेळी केली. महाराष्ट्राने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४१५ धावा केल्या.
महाराष्ट्राने धावांचा डोंगर उभारल्यानंतर आसाम संघासाठी पहिल्या डावाची सुरुवात चांगली राहिली नाही. अष्टपैलू रियान पराग याच्या ८८ धावांच्या खेळीमुळे ते २४८ पर्यंत मजल मारू शकले. महाराष्ट्रासाठी पहिल्या डावात सत्यजित बच्छाव याने ४ तर, आशय पालकर व मनोज इंगळे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
पिछाडीवर पडलेल्या आसाम संघाला महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणे याने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ४ बळी मिळवलेल्या सत्यजित बच्छाव याने दुसऱ्या डावात आणखी भेदक गोलंदाजी केली. त्याने आसामचे सात फलंदाज गारद करत आसामचा डाव १६० धावांवर संपविला. यासह महाराष्ट्राने एक डाव व ७ धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात बोली लागली नाही, पण टीम इंडियात एंट्री करणारा कोण आहे सौरभ कुमार? (mahasports.in)