भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या महिन्याच्या अखेरीस बांगलादेश विरुद्ध कोलकाता येथे होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ व भारत ब या संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांमध्ये मिळून महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जुन्नरचा युवा अष्टपैलू कौशल तांबे यालादेखील भारत संघात स्थान मिळाले. कौशलच्या निवडीनंतर जुन्नर तालुक्यातील क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला पारावर उरला नाही.
विश्वचषकासाठी भारताची तयारी सुरू
पुढील वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडीज येथे होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला आपला संघ निवडायचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीसीसीआयने बांगलादेश एकोणीस वर्षाखालील संघाविरुद्ध भारताच्या एकोणीस वर्षाखालील अ व ब संघांची तिरंगी मालिका खेळवण्याचे निश्चित केले आहे.२८ नोव्हेंबर पासून या मालिकेला सुरुवात होईल. मालिकेतील सर्व सामने कोलकाता येथे होणार आहेत. विश्वचषकआधी युएई येथे युवा संघाचा आशिया चषक खेळला जाईल.
ओतूरच्या कौशलची भारतीय संघात निवड
बांगलादेश विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी भारत ब संघात जुन्नर तालुक्यातील ओतूर गावच्या कौशल तांबे याची निवड करण्यात आली आहे. १८ वर्षीय कौशल मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र क्रिकेट संघाचे विविध वयोगटात प्रतिनिधित्व करत आहे. इतकेच नव्हे तर त्याने १६ वर्षाखालील पश्चिम विभागीय संघाचा कर्णधार म्हणून भूमिका निभावली होती. विनू मंकड ट्रॉफी आणि चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे.
पुण्यात घेतले क्रिकेटचे प्रशिक्षण
सध्या पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या कौशलने पुण्यातील विविध क्लबमधून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. केंड्स क्रिकेट अकादमीत तो मागील दहा वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे. तसेच त्याला २०१६ मध्ये एमसीएचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. बांगलादेशविरुद्धच्या तिरंगी मालिकेत त्याच्यासह विकी ओत्सवाल व राजवर्धन हंगारगेकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड झाली आहे.