---Advertisement---

लीग स्पर्धांमध्ये कोचिंग करणाऱ्या जयवर्धनेला राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा नाही, ‘हे’ आहे कारण

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 11:27 PM
---Advertisement---

नुकतेच भारतीय संघातून एक बातमी समोर आली होती. भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर प्रशिक्षक पदावरून पायउतार होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघाला आता लवकरच नवीन प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. अशात भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून कोण निवडावा याबाबत देखील सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.

या दरम्यान एक नाव खूप चर्चेचा विषय ठरला होता. ते म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याचे. जयवर्धने श्रीलंकेतील महान खेळाडूंपैकी एक खेळाडू होता. ज्याच्या कर्णधारपदाखाली देखील श्रीलंका संघाने मोठे यश मिळवले.

सध्या जयवर्धने निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून क्रिकेट स्पर्धांमध्ये कार्यरत आहे. नुकतेच जयवर्धनेच्या प्रशिक्षकपदात इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत साउदर्न ब्रेव संघाने पहिल्यावाहिल्या जेतेपदावर आपले नाव कोरले. तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्सने जयवर्धनेच्या प्रशिक्षकपदात ३ वेळा जेतेपद जिंकले आहे. त्यामुळे जयवर्धनेचे प्रशिक्षक म्हणून चांगलेच नाव झाले.

त्यामुळे जगभरातील अनेक क्रिकेट बोर्डाचे जयवर्धनेकडे प्रशिक्षक म्हणून लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे जयवर्धने लवकरच कोणत्यातरी एखाद्या संघाचा प्रशिक्षक बनू शकतो अशी चर्चा केली जात होती.

जयवर्धनेने दिले हे उत्तर
सर्व चर्चांमध्ये जयवर्धनेने सध्या तरी कोणत्याही संघाचा मुख्य कोच बनण्याची त्याची इच्छा नसल्याचे सांगितले. जयवर्धनेने सध्यातरी आपल्या परिवाराला वेळ देण्याचे ठरवले आहे. हीच त्याची प्राथमिकता असल्याचे देखील त्याने सांगितले. त्याच्या मते एखाद्या राष्ट्रीय संघाचा पूर्णवेळ प्रशिक्षक बनणे म्हणजे वर्षभर त्याच गोष्टींमध्ये व्यस्त राहण्यासारखे आहे. त्यामुळे सध्यातरी त्याला या गोष्टीमध्ये पडायचे नाही. मात्र, श्रीलंका क्रिकेटचा सल्लागार म्हणून काम करण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले. जयवर्धने सध्या क्रिकेट लीगमध्ये प्रशिक्षकाचे काम करत आहे. तसेच पुढील काही वर्ष त्याला यातच काम करायचे आहे.

परिवारासोबत वेळ घालवण्याची इच्छा
कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा नसल्याचे सांगताना जयवर्धने म्हणाला, “१८ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टींमध्ये अडकून राहणे, हे खूप कंटाळवाणे आहे. सध्या हे सुरुवातीच्या पातळीवर आहे आणि हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.”

“तसेच मला माझ्या परिवाराला वेळ देता यावा यासाठी मी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग देखील नोंदवत नाही. मात्र, श्रीलंका क्रिकेट सोबत सल्लागार म्हणून काम करायला मला आवडेल. परंतु, कोणत्याही संघाचा पूर्णवेळ प्रशिक्षक होण्याची सध्यातरी माझी कोणतीही इच्छा नाही,” असेही जयवर्धने म्हणाला.

त्याचबरोबर ‘द हंड्रेड’ या स्पर्धेविषयी बोलताना जयवर्धने म्हणाला, “या स्पर्धेत साउदर्न ब्रेव संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करण्यात खूप मजा आली. या स्पर्धेतील काही नियम खूप चांगले होते. जे पुढे जाऊन टी-२० क्रिकेटमध्ये देखील लागू केले गेले पाहिजे.”

महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धांमध्ये ‘या’ संघांचे आहे वर्चस्व, सर्वाधिक विजय नोंदवण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
लीड्स कसोटीत अश्विन खेळणार का? विराटने दिले ‘असे’ उत्तर
है तैयार हम! लीड्स कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांची तयारी पूर्ण, पाहा व्हिडिओ

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---