मुंबई- खेळाडूंना आपल्या कष्टाची किंमत आणि आदर देणाऱ्या आयोजिका राजोल संजय पाटील यांच्या दिना बामा पाटील प्रतिष्ठान आयोजित मुंबई क्लासिक 2022 राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुणेकरांनी बाजी मारली आणि स्पर्धेत महाराष्ट्र श्री विजेता चव्हाणांचा महेंद्रच बाहुबली ठरला. राज्यभरातून आलेल्या शेकडो स्पर्धकांच्या अटीतटीच्या लढतीत मुंबई आणि उपनगरच्या तगड्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढत महेंद्र चव्हाणने मुंबई क्लासिक किताबावर आपले नाव कोरले. भारत श्री सागर कातुर्डेच्या अनुपस्थितीत महेंद्रसमोर एकाही खेळाडूचे आव्हान आज टिकले नाही.
मुंबई क्लासिकच्या निमित्ताने भांडुप पश्चिमेला अक्षरश: पीळदार खेळाडूंचे झुंड पाहायला मिळाले. लाला शेठ कंपाऊंडमध्ये हजारो क्रीडाप्रेमींच्या उत्साहवर्धक उपस्थितीत पार पडलेल्या या क्लासिकल स्पर्धेत महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची पीळदार श्रीमंती अनुभवायला मिळाली. 134 स्पर्धकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत आपल्या आखीवरेखीव शरीरयष्टीचे प्रदर्शन करायला उतरलेल्या खेळाडूंवर आयोजिका राजोल संजय पाटील यांनी अक्षरश: चार लाखांच्या रोख पुरस्कारांची उधळण केली. या स्पर्धेत जिंकणाऱ्या खेळाडूला जुलैमध्ये होणाऱ्या आशिया श्री स्पर्धेची दारे उघडणार असल्यामुळे राज्यभरातून जोरदार तयारीत असलेल्या खेळाडूंची उपस्थिती लाभली.
दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना मुंबई क्लासिकच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळाले. स्पर्धा फक्त सात गटात असली तरी प्रत्येक गटात मोठ्या संख्येने खेळाडू उतरले होते. पहिल्dया चार गटात तर अव्वल पाच खेळाडू निवडताना पंचांना डोळ्यात तेल घालून आपला निकाल नोंदवावा लागत होता. स्पर्धा मुंबईत असली तरी या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि ठाण्यातील खेळाडू आपली करामत दाखवत होते. 55 किलो वजनी गटात अव्वल स्थानासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. कोल्हापूरच्या अवधूत निगडेने मुंबईकर नितीन शिगवणला मागे टाकत यश संपादले. 60 किलो वजनी गटात सातारचा रामा मायनाक पहिला आला तर 65 किलो वजनी गटात पुणेकर सूरज सूर्यवंशी अव्वल ठरला. या गटात पहिल्या पाच क्रमांकात मुंबई आणि उपनगरचा एकही खेळाडू बसला नाही. मात्र स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले ते मुंबईकर संदीप सावळेने. त्याने 70 किलो गटात केवळ अव्वल स्थान मिळविले नाही तर त्याच्या देहयष्टीसमोर सारेच खुजे वाटत होते. 75 किलो गटात पुण्याचाच तौसिफ मोमीन पहिला आला. मुंबईला एकमेव गट विजेतेपद मिळवून दिले ते गणेश पेडामकरने. 80 किलो वजनी गटात त्याने मुंबईच्याच भास्कर कांबळी आणि आशीष लोखंडेवर मात केली. सर्वात मोठ्या गटात महेंद्र चव्हाणसमोर सुशांत राजणकर आणि निलेश दगडे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.
महेंद्र चव्हाणला तोड नाही…
सागर कातुर्डे आणि सुजन पिळणकर या मुंबईकर दिग्गजांच्या अनुपस्थितीमुळे महेंद्र चव्हाणच जेतेपदाचा दावेदार होता आणि त्यानेच बाजी मारली. किताबासाठी झालेल्या लढतीत महेंद्रला थोडीशी का होईना लढत दिली ती एकट्या संदीप सावळेने. 70 किलोचा हा खेळाडू जबरदस्त तयारीत होता. पण त्याने अप्रतिम पोझेस मारत जजेसना थक्क करून सोडले. तो उपविजेता ठरला. गणेश पेडामकरला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. किताब विजेता महेंद्र चव्हाण पाऊण लाखाचा मानकरी ठरला तर संदीपला 50 हजार आणि गणेशला 25 हजारांचे रोख इनाम दिले गेले. महेंद्र चव्हाणसह तौसिफ मोमीन आणि सूरज सुर्यवंशी या पुणेकरांनी गटविजेतेपद पटकावत पुण्याचा दबदबा दाखवून दिला. या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा माजी आमदार सचिन अहिर, आयोजिका राजोल पाटील, आयोजक आणि आमदार रमेश कोरगावकर तसेच शरीरसौष्ठव संघटनेचे दिग्गज पदाधिकारी प्रशांत आपटे, पाम रोठे, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे आणि विजय झगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्राच्या संघासाठी दहा जणांची निवड
जुलै महिन्यात होत असलेल्या आशिया श्री स्पर्धेसाठी येत्या 22 मेला हिमाचल प्रदेशात भारतीय संघाची निवड चाचणी घेतली जाणार आहे. त्या चाचणीसाठी आज झालेल्dया मुंबई क्लासिकमधून दहा तगड्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली. त्यात विजेता महेंद्र चव्हाण, उपविजेता संदीप सावळेसह गणेश पेडामकर, अवधूत निगडे, रामा मायनाक, तौसिफ मोमीन, भास्कर कांबळी, आशीष लोखंडे, सुशांत रांजणकर आणि निलेश दगडे यांची वर्णी लागली. हे दहा खेळाडू राष्ट्रीय निवड चाचणीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील.
मुंबई क्लासिक 2022 स्पर्धेचा निकाल
55 किलो वजनी गट – 1. अवधूत निगडे (कोल्हापूर), 2. नितीन शिगवण (मुंबई उपनगर), 3. विनोद पोतदार ( कोल्हापूर), 4. दिनेश चाळके ( रायगड)
60 किलो – 1. रामा मायनाक (सातारा), 2. मोहसीन शेख (पुणे), 3. बाळू काटे (पुणे), 4. जुगल शिवले (ठाणे), 5. संजीव जाधव (कोल्हापूर).
65 किलो- 1. सुरज सूर्यवंशी (पुणे), 2. किशोर गोळे (मुंबई), 3.हर्षद मांडवकर (प. ठाणे), 4. अजय केतरे (कोल्हापूर), 5.अजिंक्य पवार (मुंबई).
70 किलो- 1. संदीप सावळे (मुंबई उपनगर), 2. अमित पाटील (कोल्हापूर), 3. विनायक लोखंडे (प. ठाणे), 4. विशाल धावडे (मुंबई उपनगर), 5. वैभव महाजन (ठाणे).
75 किलो – 1.तौसिफ मोमीन (पुणे), 2. सलीम सय्यद (मुंबई उपनगर), 3. संजय इल्हे (मुंबई उपनगर), 4. जगदीश कावणकर (मुंबई उपनगर), 5. आकाश सिंग (ठाणे).
80 किलो – 1. गणेश पेडामकर (मुंबई), 2.भास्कर कांबळी (मुंबई उपनगर), 3. संदेश नागदेव (ठाणे), 4. आशीष लोखंडे (मुंबई), 5. सुहैल तांबोळी (सांगली).
80 किलोवरील- 1. महेंद्र चव्हाण (पुणे), 2. सुशांत रांजणकर (मुंबई), 3. निलेश दगडे (मुंबई उपनगर), 4. सचिन डोंगरे (मुंबई उपनगर), 5. मनोज बोचरे (मुंबई उपनगर).
मुंबई क्लासिक 2022 चे विजेते
किताब विजेता – महेंद्र चव्हाण (पुणे),
उपविजेता – संदीप सावळे (मुंबई उपनगर),
तिसरा क्रमांक – गणेश पेडामकर (मुंबई).
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजी करण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये बॅट खाताना दिसला धोनी, असे का करतो थाला? घ्या जाणून
पंचांमुळे वॉर्नर वाचवू शकला नाही आपली विकेट, बाद झाल्यानंतर असा व्यक्त केला राग- Video