भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका ‘नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम’मध्ये खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला परभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत इंग्लंड संघावर ७ गडी राखून विजय मिळवला आहे.
या सामन्यात पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पदार्पणाच्या सामन्यात ५६ धावांची खेळी करणाऱ्या ईशान किशनला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मात्र ईशान व्यतिरिक्त यापूर्वी असे ३ भारतीय खेळाडू होऊन गेले, ज्यांना पदार्पणाच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
१) मोहित शर्मा :
भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मा याला २०१३ मध्ये भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने किफायतशीर गोलंदाजी करत १० षटकात अवघ्या २६ धावा देत २ गडी बाद केले होते. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
२) पृथ्वी शॉ :
भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने २०१८ मध्ये वेस्टइंडीज संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याने या सामन्यात ९९ चेंडूत शतक झळकावले होते. कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला होता. याच कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
३) नवदिप सैनी :
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात वेस्ट इंडिज संघाविरुद्ध केली होती. त्याने २०१९ मध्ये झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी करत १७ धावा देत ३ गडी बाद केले. यात त्याने एक निर्धाव षटक देखील फेकले होते. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
४) ईशान किशन :
इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२o सामन्यात ईशान किशनला टी-२० संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने करत त्याने ५६ धावांची महत्वाची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या:
आज हिरो ठरलेल्या ईशानला काही वर्षांपूर्वी लोकांनी केली होती मारहाण, दिली गेलेली पोलीस तक्रार
आयपीएल २०२२ मध्ये ईशान आणि सूर्यकुमार नसणार मुंबईचा भाग? हे आहे कारण
दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बांग्लादेश संघ आला होता काळाच्या तोंडून बाहेर