इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला. चेन्नईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ १५२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात कोलकाता संघाला ७ विकेट्स गमावत १४२ धावाच करता आल्या.
एकवेळ अशी होती, जेव्हा कोलकाताचा विजय निश्चित असल्याचे वाटत होते. शेवटच्या ५ षटकात त्यांना विजयासाठी अवघ्या ३१ धावा करायच्या होत्या आणि त्यांचे ६ फलंदाज मैदानावर यायचे बाकी होते. तरीही सामना जिंकण्यात त्यांना यश आले नाही. कोलकाताच्या या लाजिरवाण्या पराभवाचे कारण ठरला, मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चाहर.
सामना जिंकल्यानंतर सामनावीर चाहरने त्याच्या शानदार गोलंदाजीमागे कर्णधार रोहित शर्माचा हात असल्याचे सांगितले. त्याचा आपल्यावर असलेला विश्वास आपल्यात आत्मविश्वास भरतो. यामुळेच आपण चांगली गोलंदाजी करु शकत असल्याचे त्याने सांगितले आहे.
“कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात चांगली केल्याने आमच्यावर दबाव निर्माण झाला होता. म्हणून सामना आमच्या बाजूने करण्याची जबाबदारी फिरकीपटूंवर आली होती. वेगवान चेंडूला वळण देणे हीच माझी खरी ताकद आहे आणि मी याचा पुरेपुर वापर केला. राहुल त्रिपाठीची विकेट माझ्यासाठी शानदार राहिली. कारण माझ्या अपेक्षेप्रमाणे तो अगदी त्याच पद्धतीने बाद झाला,” असे चाहर म्हणाला.
पुढे कर्णधार रोहितविषयी बोलताना चाहरने सांगितले की, “विशेष म्हणजे रोहित शर्माचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे मी एवढी चांगली कामगिरी करु शकलो. त्याने गोलंदाजी माझ्या सोपवल्यानंतर मला म्हटले की, तू आत्मविश्वासाने गोलंदाजी कर. तुझे चेंडू कधीकधी मलाही समजत नाहीत, मग कोलकाताच्या फलंदाजांनाही त्याचा सामना करता येणार नाही. तू फक्त योग्य लेंथवर चेंडू टाक आणि चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न कर. रोहितच्या या वाक्यांमुळे मी माझ्या नैसर्गिक शैलीत गोलंदाजी करु शकलो. परिणामत: आम्ही सामना जिंकला.”
https://twitter.com/mipaltan/status/1382174270822957057?s=20
मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात २१ वर्षीय चाहरने अविश्वसनीय आणि अभुतपुर्व कामगिरी केली. संघाला ज्यावेळी विकेट्सची नितांत गरज होती, त्यावेळी त्याने महत्त्वाच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. नितिश राणा (५७ धावा) शुबमन गिल (३३ धावा) यांच्या विकेट्स अतिशय महत्त्वपुर्ण ठरल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठी, कोलकाताचा कर्णधार ऑएन मॉर्गन या धाकड फलंदाजांचीही त्याने शिकार केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणूनच मुंबई इंडियन्सचे खेळाडू इतके प्रगतीशील आहेत,’ भारतीय दिग्गजाने केली रोहितची स्तुती
अतिशय निराशादायी, माफी असावी; केकेआरच्या दारुण पराभवानंतर संघ मालकाने व्यक्त केली दिलगिरी
गमावता सामना जिंकण आम्हाला जमतं! मुंबई इंडियन्सने कसा केला सामन्याचा कायापालट? ऐका रोहितच्या तोंडून