भारतीय संघ २०२०-२०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का ही आपल्या पहिल्या अपत्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जन्म देऊ शकते. त्यामुळे, तिच्यासोबत राहण्यासाठी विराट भारतात दाखल होईल. मात्र, विराट भारताला जाण्यापूर्वी तो खेळणार असलेल्या सामन्यांत काहीतरी खास कामगिरी करेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने मांडले आहे.
विराट मैदानावर १००% योगदान देतो
ईसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत स्टॉयनिस म्हणाला, “विराट प्रत्येक सामन्यात जीव ओतून खेळत असतो. यामागे, त्याची काही विशेष प्रेरणा असू शकते. मी त्याला प्रत्येकवेळी मैदानावर १००% योगदान देताना पाहिले आहे.”
पालकत्व रजेचा निर्णय योग्य
विराटने पालकत्व रजा घेतल्यामुळे अनेकांनी त्याला लक्ष केले. मात्र, स्टॉयनिसने त्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पालकत्व रजेविषयी बोलताना स्टॉयनिस म्हणाला, “विराट भारतात जाईल, याचा अंदाज आम्ही लावला होता. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी तो तिथे असावा, अशी त्याची इच्छा असेल. माझ्या मते त्याचा हा निर्णय अतिशय योग्य आहे. ही विशेष घटना असते.”
विराटसाठी ऑस्ट्रेलियाची रणनीती तयार
ऑस्ट्रेलिया संघाच्या रणनीतीविषयी बोलताना स्टॉयनिस म्हणाला, “जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असलेल्या, विराटचा सामना करण्यासाठी आमच्याकडे विशेष रणनीती आहे. आमचे प्रशिक्षक जस्टीन लँगर हे सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. आम्ही भूतकाळात देखील अशा काही योजना आखल्या होत्या. त्यातील काही यशस्वी ठरल्या, तर काहींमध्ये आम्हाला अपयश आले.”
स्टॉयनिसने आयपीएलमध्ये केली होती चमकदार कामगिरी
नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये स्टॉयनिसने दिल्ली कॅपिटल्चे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलचा हा हंगाम स्टॉयनिससाठी आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी हंगाम ठरला. त्याने स्पर्धेत १६ सामने खेळताना ३५२ धावा व १३ बळी आपल्या नावे केले होते.
आयपीएलमधील फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल
भारताविरुद्धच्या आगामी मालिकेविषयी बोलताना स्टॉयनिस म्हणाला, “या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी मी खूप उत्साही आहे. आयपीएलमध्ये मला चांगलीच लय गवसली होती. आयपीएलमधील फॉर्म कायम राखण्याचा मी प्रयत्न करेल. आयपीएलवेळी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक असलेल्या रिकी पॉंटिंग यांची मला मोलाची मदत झाली होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी १५० ओव्हर टाकल्यात’, टीम इंडियाच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियन फिरकीपटूचे आव्हान