भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. माजी क्रिकेटपटू आणि जाणकार या मालिकेविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बूचरनेही आगामी मालिकेविषयी आपली मते मांडली. भारतीय फिरकीपटू सर्वात्तम आहेत तरीही, अष्टपैलू रवींद्र जडेजा नसणे, इंग्लंडच्या फायद्याचे आहे, असे बूचरने म्हटले.
पुढील महिन्यात सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
नव्या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होत आहे. बंद दाराआड खेळवली जाणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने खेळाडू तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारताचे फिरकीपटू सर्वोत्तम
इंग्लंडकडून ७१ कसोटी सामने खेळणार्या बूचरने आगामी मालिकेविषयी अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. तो म्हणाला, “भारताविरुद्धची मालिका इंग्लंडसाठी सोपी राहणार नाही. श्रीलंकेतील परिस्थिती आणि येथील परिस्थितीत खूप तफावत आहे. इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी धैर्याने खेळ करावा लागेल. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नसतात. त्यामुळे इंग्लंडसाठी वेगळे आव्हान असेल. रविचंद्रन अश्विन भारताचा प्रमुख गोलंदाज असला तरी इतर गोलंदाजांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”
भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना बूचर पुढे म्हणाला, “भारतीय संघाकडे दर्जेदार फिरकीपटूंची कमतरता नाही. आमच्या नवख्या फलंदाजांना त्यांचा सामना करणे अवघड जाईल. परंतु, अनुभवी रवींद्र जडेजा संघात नसणे, इंग्लंडसाठी दिलासादायक आहे. भारताची जागतिक दर्जाची गोलंदाजी जडेजामुळे आणखीन धारदार बनते.”
इंग्लंड संघाला नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौ-यात डावखुरा फिरकी गोलंदाज लसिथ एमबुलडेनियाने त्रस्त केले होते. या युवा फिरकीपटूने दोन सामन्यात १५ इंग्लिश फलंदाजांना बाद करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी.! जय शाह यांची आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती
IPL 2021: भज्जीचा सीएसके सोबतचा प्रवास संपला, पण ‘हे’ ३ संघ बोली लावण्यास असतील उत्सुक
खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वीला ‘हा’ मुंबईकर देणार फलंदाजीचे धडे