भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला आज सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नियमित सलामीवीर डेविड वॉर्नर याने दुखापतीतून सावरल्याने पुनरागमन केले. मात्र सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजीत तो फारशी चमक दाखवू शकला नाही.
वॉर्नर ८ चेंडूत अवघ्या ५ धावा काढून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या हातात झेल देऊन माघारी परतला. मात्र त्याच्या या बाद होण्याच्या पद्धतीवर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वाॅ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वॉर्नर चुकीचा फटका खेळून बाद
फॉक्स क्रिकेटशी बोलताना मार्क वाॅ यांनी वॉर्नरच्या बळीवर भाष्य केले. ते म्हणाले, “वॉर्नरने खेळलेला फटका अतिशय खराब होता. या पद्धतीचा फटका तुम्ही कसोटी क्रिकेटच्या पहिल्या २० मिनिटात खेळू नाही शकत. त्याने खोल टप्प्याचा चेंडू पाहून ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या फटक्यासाठी जागा नव्हती. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर उगाचच फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याची दुखापत जर बरी झाली होती तर त्याने चेंडूच्या अधिक जवळ जाऊन तो फटका खेळण्याची गरज होती. पण बहुधा त्याने वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात आपला संयम गमावला.”
ऑस्ट्रेलियाचाच माजी फलंदाज मायकेल हसीने देखील वॉर्नरच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, “वॉर्नर पूर्णतः तंदुरुस्त असल्याचे जाणवत नव्हते. त्याला समस्या जाणवत होत्या, असे वाटले. ज्या वॉर्नरला आपण नेहमी बघतो, तो वॉर्नर आज जाणवला नाही. संघासाठी हे फार चांगले संकेत नाही आहेत.”
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ५५ षटकात २ बाद १६६ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशाने आणि विल पुकोवस्की यांनी अर्धशतके झळकावली. मात्र पुकोवस्की अर्धशतकानंतर ६२ धावांवर नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर बाद झाला असून दिवसाखेर लॅब्यूशाने ६७ तर स्टीव स्मिथ ३१ धावांवर नाबाद आहेत. भारताकडून मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीने प्रत्येकी एक बळी मिळविला. पहिल्या दिवशी पावसामुळे ५५ षटकांचाच खेळ होऊ शकला.
संबंधित बातम्या:
IND vs AUS : पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; पुकोवस्की-लॅब्यूशानेची अर्धशतकी खेळी
AUS v IND : पुरुषांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच महिलेने केले अंपायरींग, सिडनीत रचला इतिहास
दहा मिनिटात दोन झेल सोडल्याने रिषभ पंतवर चाहत्यांची आगपाखड, मीम्स व्हायरल