शनिवारपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. पण या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सलामीवीर फलंदाज एडेन मार्करम तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
त्याला पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान उजव्या मनगटाला दुखापत झाली आहे. पुणे कसोटीत दुसऱ्या डावात शून्य धावेवर बाद झाल्यानंतर स्वत:च्याच कामगिरीवर निराश होऊन मार्करमने एका वस्तूवर हात मारला. त्यामुळे त्याच्या मनगटाला फ्रॅक्टर झाले आहे. परिणामी त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे.
या दुखापतीवर पुढील उपचारासाठी मार्करम आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेने बदली खेळाडूची निवड केलेली नाही.
मार्करम दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शून्य धावेवर बाद झाला होता.
या दुखापतीबद्दल मार्करम म्हणाला, ‘अशा परिस्थिती परतने हे दु:खदायक आहे. मला माझी चूक कळाली आहे. माझ्यामुळे संघाला त्रास झाल्याचे मला जास्त वाईट वाटत आहे. यातून मी खूप काही शिकलो आहे , तसेच अन्य खेळाडूही यामधून शिकले असतील.’
खेळामध्ये अनेकदा भावना वरचढ ठरतात असे म्हणत पुढे मार्करम म्हणाला, ‘यासाठी माफी नाही. जे झाले त्याची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. मी माझ्या संघाची माफी मागतो. आशा आहे यातून मी बाहेर येऊन संघासाठी आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांसाठी चांगली कामगिरी करेल.’
तिसऱ्या कसोटीतून दुखापतीमुळे बाहेर पडणारा मार्करम हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू आहे. याआधी फिरकी गोलंदाज केशव महाराजही खांद्याच्या दुखापतीमुळे रांचीला होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेने जॉर्ज लिन्डची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे.
#CSAnews #BreakingNews Markram ruled out of third Test match https://t.co/rkjpA5fzGF #INDvSA pic.twitter.com/NXh2ri4zvF
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 17, 2019