वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज तसेच दोन वेळचा टी20 विश्वचषक विजेता मार्लन सॅम्युअल्स अमिराती क्रिकेट बोर्डाच्या (ECB) भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत चार गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला आहे. सॅम्युअल्सवर इसीबीच्या वतीने सप्टेंबर 2021 मध्ये आयसीसीने आरोप लावले होते. स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणासमोर झालेल्या खटल्यानंतर सॅम्युअल्स यामध्ये दोषी आढळला.
त्याला कलम 2.4.2, 2.4.3, 2.4.6 आणि 2.4.7 नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, सॅम्युअल्स हा कोणत्याही प्रकारची भेटवस्तू किंवा पेमेंट स्वीकारल्यामुळे दोषी आढळला आहे. या भेटवस्तू स्वीकारल्याने खेळाची बदनामी होऊ शकते, असे यामध्ये नमूद करण्यात आलेले. सदर आरोप अबूधाबी टी10 च्या 2019 च्या हंगामातील आहेत. त्यावेळी सॅम्युअल्सचा कर्नाटक टस्कर्स संघात समावेश होता. मात्र, तो स्पर्धेत खेळला नव्हता. आता प्रत्येक बाजूचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायाधिकरण आपला निकाल देणार आहे. या प्रकरणात त्याला मोठी शिक्षा होऊ शकते.
मात्र, सॅम्युअल्सच्या बाबतीत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याचा वादांशी जुना संबंध राहिला आहे. याआधीही 2008 साली त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वेस्ट इंडिजकडून 71 कसोटी, 207 वनडे आणि 67 टी20 सामने खेळले आहेत. या संपूर्ण कारकिर्दीत त्याने 17 शतकांच्या मदतीने 11,134 धावा आणि 152 विकेट्स घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजने 2012 आणि 2016 मध्ये दोनदा टी20 विश्वचषक जिंकला होता. सॅम्युअल्स या दोन्ही संघांचा एक भाग होता.
(Marlon Samuels found guilty of breaching 4 counts of the anti-corruption code)
महत्वाच्या बातम्या –
“मुले मुलांविरुद्ध खेळताना दिग्गज वाटतात”, गावसकरांची टीम इंडियावर खोचक टीका
‘ब्लास्टर’ ब्रुकची वर्ल्डकप वारी हुकली! ‘या’ कारणाने निवडसमितीने दाखवला अविश्वास






