भारताचा रविचंद्रन अश्विन सध्या कसोटी क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. या अनुभवी फिरकीपटूचे अनेक दिग्गज फलंदाजांनी कौतुक केले आहे. अलीकडेच अश्विनचे ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्युशेनने खूप कौतुक केले आहे. एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना, लॅब्युशेनने अश्विनचे कौतुक करताना म्हटले की, या ऑफस्पिनरविरुद्ध फलंदाजी करताना तुम्हाला नक्कीच तुमचा दर्जा उंचवावा लागतो.
त्याचवेळी, अश्विनचे डावपेच इतर फिरकीपटूंपेक्षा वेगळे का असतात? असे विचारले असता तो म्हणाला, “अश्विनची इतकी चांगली कामगिरी असण्याचे कारण म्हणजे तो सामन्याचा विचार करणारा खेळाडू आहे. तो नेहमी विचार करत असतो की, तो तुम्हाला कसा बाद करेल.”
तो पुढे म्हणाला, “त्याच्या विरुद्ध खेळताना तुम्हाला आणि मी प्लॅन बनवायला लागतो. तो खरोखर प्रतिभाशाली गोलंदाज आहे. आता सगळेच गोलंदाज असे नसतात. त्याचे काही चेंडू असे असतात, ज्याचे तुमच्याकडे उत्तर नसते. फलंदाजाला बाद करण्यासाठी विचार करणारे गोलंदाज नेहमी उपयुक्त ठरतात.”
लॅब्युशेनने कबूल केले की, “काही खेळपट्ट्यांवर हे सोपे आहे, कारण तुम्हाला फक्त तिथे चेंडू टाकणे आवश्यक आहे. खेळपट्टी मुळे तुम्हाला अनेकदा खराब चेंडूवर बळी मिळतात. मात्र, अश्विन असा नाही. तो जगभरातील अनेक खेळपट्ट्यांवर खेळला आहे. त्याने आपल्या मेहनतीने तेथे बळी मिळवले आहेत. अश्विन विरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. कारण, तो तुम्हाला आपला सर्वोत्तम खेळ खेळण्यास भाग पाडतो. त्याचा सामना करणे नेहमीच तुम्हाला नवीन गोष्टी शिकवते.” ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विन याने अप्रतिम गोलंदाजी करत लॅब्युशेनला दोन वेळा तंबूचा रस्ता दाखवला होता. अश्विन सध्या जागतिक कसोटी गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तेव्हा अक्षरशः डोळे लाल होईपर्यंत रडणारा ‘खंबीर’ विराट सर्वांनी पाहिला (mahasports.in)