तारीख १८ ऑगस्ट २०१९, ठिकाण- क्रिकेटची पंढरी मानले जाणारे लॉर्ड्स मैदान. जगातील सर्वात प्रसिद्ध द्विपक्षीय क्रिकेट मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा अखेरचा दिवस.
ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा कणा असणाऱ्या स्टीव स्मिथच्या हेल्मेटवर इंग्लंडचा सर्वात वेगवान गोलंदाज व महिनाभरापूर्वी इंग्लंडला वनडे क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या जोफ्रा आर्चरने टाकलेला एक बाउन्सर येऊन आदळला. स्मिथ मैदानाबाहेर गेला. त्याची कन्कशन टेस्ट झाली आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या एका फलंदाजाला संघात स्थान देण्यात आले.
ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने स्मिथच्या जागी ज्या खेळाडूला निवडले तो आपले ऍशेस पदार्पण ‘कन्कशन सबस्टीट्यूट’ म्हणून करत होता. तसेच, क्रिकेटविश्वातील पहिला ‘कन्कशन सबस्टीट्यूट’ होण्याचा मान देखील या खेळाडूकडे गेला. स्मिथची जागा घेणारा हा फलंदाज होता मार्नस लॅब्युशेन.
यापूर्वी उणेपुरे पाच कसोटी सामने खेळलेल्या लॅब्युशेनला ऑस्ट्रेलिया संघात स्टीव स्मिथची जागा घेणे सोपे नव्हते. कारण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गाजलेल्या व ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कलंकित करणाऱ्या ‘सॅंडपेपर’ प्रकरणानंतर स्मिथने या ऍशेसच्या पहिल्या एजबॅस्टन कसोटीतून पुनरागमन केले होते. दोन्ही डावात शतक झळकावत त्याने ऑस्ट्रेलियाला अविस्मरणीय असा विजय मिळवून दिलेला. चालू सामन्यात देखील त्याने पहिल्या डावात ९२ धावांची खेळी केलेली. त्यामुळे, युवा लॅब्युशेनवर स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी होती.
पास झाला ऍशेसची परिक्षा
ऑस्ट्रेलियाचा संघ लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात २६७ धावांचा पाठलाग करताना पहिले तीन फलंदाज झटपट बाद झालेले. त्यानंतर, लॅब्युशेनने आपली प्रतिभा दाखवत ५९ धावांची लाजवाब खेळी केली. ही ऑस्ट्रेलियाच्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली व ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत ठेवला.
लॉर्ड्स कसोटीतील झुंजार अर्धशतकाचे बक्षीस म्हणून लॅब्युशेनला तिसऱ्या हेडिंग्ले कसोटीसाठी देखील संघात स्थान मिळाले. बेन स्टोक्सच्या त्या ऐतिहासिक शतकासाठी लक्षात राहणाऱ्या या सामन्यात देखील लॅब्युशेनने ७४ व ८० धावांच्या खेळ्या केल्या. चौथ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत अर्धशतक साजरे केले. स्मिथच्या लाजवाब द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत ऍशेसची कुपी आपल्याकडेच राहील याची खबरदारी घेतली. अखेरची पाचवी कसोटी इंग्लंडने जिंकल्यामुळे मालिका २-२ अशा बरोबरीत सुटली. मात्र, अवघ्या ७ डावात ३५३ धावा करणारा लॅब्युशेन ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित हातात आहे हे सांगून गेला.
पाकिस्तान विरुद्ध दाखवला जलवा
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील ऑस्ट्रेलियाची व लॅब्युशेनची पहिली परीक्षा तर, समाधानकारक ठरली. त्यानंतर, मायदेशात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन डाव खेळताना त्याने १८५ व १६२ धावांच्या खेळ्या रचल्या. मार्नस लॅब्युशेन नावाचे हे रसायन काहीतरी वेगळेच आहे, याची प्रचिती एव्हाना समस्त क्रिकेटजगताला आली होती.
दणाणून सोडली न्यूझीलंडविरुद्धची मालिका
आपल्या पहिल्या दोन मालिकांमध्ये प्रभावित केल्यानंतर लॅब्युशेनची पुढील परीक्षा होती न्यूझीलंडसमोर. न्यूझीलंडचे गोलंदाजी आक्रमण सध्या विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण मानले जाते. त्यांच्यासमोर लॅब्युशेन कशी फलंदाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यातील ६ डावांमध्ये त्याच्या धावसंख्या होत्या १४३, ५०, ६३, १९, २१५ व ५९. अशाप्रकारे त्याने अक्षरश: किवी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला.
भारताविरुद्ध दाखवला आशेचा किरण
कोरोना महामारीमुळे जवळपास १० महिने क्रिकेट न खेळलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला आपल्याच मायदेशात भारतीय संघाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची होती. ही मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्याचा ऑस्ट्रेलियाचा मनसुबा होता. मात्र, युवा भारतीय संघाने त्यांच्या या अपेक्षांवर पाणी फेरत २-१ ने सरशी साधली. असे असले तरी, लॅब्युशेनच्या फॉर्ममध्ये काही फरक पडला नव्हता. त्याने सर्व चार सामने खेळताना ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ४२६ धावा जमविल्या.
पुढे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळून संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने कोरोनाचे कारण देत ही मालिका रद्द केली व न्यूझीलंडचा संघ आपोआप या ऐतिहासिक सामन्यासाठी पात्र ठरला.
WTC चा शहेनशहा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला काहीसा नवखा असलेल्या या खेळाडूने १४४ वर्षांची परंपरा असलेल्या कसोटी क्रिकेटची ही सर्वात मोठी स्पर्धा मात्र गाजवून सोडली. त्याची या स्पर्धेतील आकडेवारी पाहता सर्वजण अवाक् होतील. लॅब्युशेनने स्पर्धेत १३ सामने खेळताना २३ डावांमध्ये ७२.८२ च्या अविश्वसनीय सरासरीने १६७५ धावा बनविल्या. यामध्ये ५ दणदणीत शतके व ९ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधील अनेक दिग्गजांना पछाडत तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
ज्यावेळी कधीही पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विषय निघेल त्यावेळी, या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा आपोआप उत्तर येईल ‘कन्कशन सबस्टीट्यूट’ आलेला मार्नस लॅब्युशेन!
महत्त्वाच्या बातम्या –
जून महिना, इंग्लंडचे मैदान, भारतीय संघ अन् आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना-एक अनोखा योगायोग
WTC स्पर्धेत या ५ फलंदाजांच्या बॅटमधून निघाल्या सर्वाधिक धावा, भारताच्या रहाणेचाही समावेश