यूएई येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) पहिल्या सामन्यात ब गटातील न्यूझीलंड आणि स्कॉटलंड हे संघ समोरासमोर आले. दुबई येथील दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने सलग दुसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. शानदार ९३ धावांची खेळी करणाऱ्या सलामीवीर मार्टिन गप्टिलने या खेळीसह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
गप्टीलची धुवाधार खेळी
पहिल्या दोन सामन्यात फॉर्मशी झगडत असलेल्या अनुभवी गप्टिलने या सामन्यात स्कॉटलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत चौकार-षटकारांची बरसात केली. १९ व्या षटकात व्हीलच्या गोलंदाजीवर झेलबाद होण्यापूर्वी त्याने ५६ चेंडूत ६ चौकार व ७ गगनचुंबी षटकार ठोकत ९३ धावा काढल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६६ इतका जबरदस्त राहिला. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील १८ वी अर्धशतकी खेळी ठरली. त्याच्या नावावर दोन शतके देखील जमा आहेत.
अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज बनला गप्टिल
आपल्या ९३ धावांच्या खेळीदरम्यान गप्टिलने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३००० धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय टी२० मध्य अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी अशी कामगिरी केवळ भारतीय कर्णधार विराट कोहली याने केली असून, त्याच्या नावे ३२२५ धावा जमा आहेत. गप्टिलने २००९ पासून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळताना १०५ सामन्यात ३२.६४ च्या सरासरीने ३०६९ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा असून त्याने आतापर्यंत २९१२ धावा जमविल्या आहेत.
न्यूझीलंडचा दुसरा विजय
भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर या सामन्यात न्यूझीलंड संघाने स्कॉटलंड संघाला सहजरीत्या पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना गप्टिलच्या ९० व ग्लेन फिलीप्सच्या ३३ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने १७२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात, ट्रेंट बोल्ट व ईश सोडी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत स्कॉटलंडचा डाव १५६ पर्यंत मर्यादित ठेवला. या विजयासह न्यूझीलंड गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/martin-guptil-become-first-batter-who-hit-150-sixes-in-t20i/






