क्रिकेटपटू आणि त्यांचे अफेयर यांच्या चर्चा कोणालाही नवीन नाहीत. क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होते. याला वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विवियन रिचर्ड्सही अपवाद नाहीत. त्यांची आणि भारतीय अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या अफेअरबद्दलही 90 च्या दशकाच्या आसपास बरीच चर्चा झाली होती. पण त्यांनी कधीही लग्न केले नाही. त्यांचे नाते नेहमीच विवादांमध्ये राहिले.
1987 चा विश्वचषक भारतात होत होता. त्याचदरम्यान एका पार्टीत रिचर्ड्स आणि नीना यांची एकमेकांशी ओळख झाली. त्या विश्वचषकानंतर रिचर्ड्स मायदेशी परत गेले. परंतू त्यांचा आणि नीना यांच्याशी संपर्क कायम होता. ते एकमेकांना कधी लंडनमध्ये तर कधी अँटिग्वामध्ये भेटतही होते.
त्यांच्या अफेअरबद्दल सुरुवातीला कोणालाही काही माहित नव्हते. पण एकदा कोलकातामधील एका क्लबमध्ये योग्य फुटवेअर (शुज किंवा चप्पल) नसल्याच्या कारणाने त्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यावेळी सर्वांना रिचर्ड्स आणि नीना यांच्या नात्याबद्दल माहिती झाली. त्यांच्या नात्याची यासाठीही चर्चा झाली की त्यावेळी रिचर्ड्स आधीच विवाहित होते आणि त्यांना 2 आपत्यही होते. त्यावेळी ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते.
नीना जेव्हा गर्भवती होत्या त्यावेळी सुरुवातीला त्यांना त्यांच्या कुटुंबाने साथ दिली नाही. परंतू त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वडीलांनी त्यांना पाठिंबा दिला. नीना यांना एक मुलगी झाली. तिचे पालन-पोषण करण्याचा निर्णयही नीना यांनी घेतला. नीना आणि रिचर्ड्स यांच्या या मुलीचे नाव मसाबा असून आज ती भारतातील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिचे पालन-पोषण जरी नीना यांनी केले असले तरी अनेकदा मसाबा रिचर्ड्स यांच्याबरोबरही राहिली आहे.
एका मुलाखतीत मसाबाने तिच्या बालपणाबद्दल बोलताना सांगितले होते की जेव्हा ती तिचे वडील रिचर्ड्स यांच्यासह वेस्ट इंडिजला जायची तेव्हा रिचर्ड्स क्रिकेटमध्ये व्यस्त असायचे आणि जेव्हा ते समालोचन करायचे तेव्हा ती समालोचन कक्षात झोपायची. मसाबाला रिचर्ड्स यांची पत्नी मरियमने स्विकारले होते.
नीना यांचे रिचर्ड्सशी लग्न झाले नाही पण 2008 ला त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी अमेरिकेत लग्न केले. विवेक चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. तसेच प्रख्यात कंपनी प्राइस वॉटरहाऊस कूपरचे भागीदारही आहेत.
ट्रेंडिंग लेख –
भारतीय क्रिकेट वर्तुळात अतिशय आदराने नाव घेतले जाणारे एनकेपी साळवे होते तरी कोण?
युवराजपेक्षा सरस असलेला महाराष्ट्राचा अभिजीत काळे भारतासाठी खेळला फक्त एक सामना
जगातील ३ सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; २ आहेत भारतात






