---Advertisement---

देवपण मिळूनही माणुसपण जपणारा ‘सचिन’

On: सोमवार, एप्रिल 24, 2023 11:55 AM
---Advertisement---

– वरद सहस्रबुद्धे
क्रिकेट हा धर्म असेल तर क्रिकेटची मैदाने मंदिरे आहेत, या धर्मात चाहते भक्ताप्रमाणे जयपराजयाची प्रार्थना करीत असतात, आणि खेळणारे खेळाडु या मंदिरातले देव असतात. प्रत्येक चाहत्याचे आदर्श, देव वेगवेगळे असतील, नाही आहेच… पण एका खेळाडुच नाव ऐकले, पाहिले की त्याच्या २४ वर्षांच्या कारकीर्दीची “हायलाइट्स” डोळ्यासमोरून तरळून जाते. त्याने भारतीय क्रिकेटची २४ वर्ष सेवा करताना अनेक विक्रम केले आहेतच. याशिवाय समजा तो लवकर आऊट झालाच किंवा अम्पायरनी चुकीचा निर्णय देऊन त्याला आऊट दिले तरी तो न चिडता, न रागावता, प्रतिस्पर्ध्यांचा मान राखत पॅवेलियनच्या दिशेने चालु पडायचा. आज क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटच्याबाहेरही त्याने अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत म्हणुनच त्यांच्या चाहत्यांनी (विशेषतः भारतीय)त्याला क्रिकेटचे दैवत्व बहाल केले आहे. असे असले तरी ह्यामागे मेहनत, शारिरीक स्थैर्य, मानसिक धैर्य आणि चाहत्यांवर असलेले प्रेम यामुळे भारतातच नव्हे तर बराक ओबामा, रॉजर फेडरर, डैनियल रैडिक्लिफ सारखे विदेशी सेलिब्रिटीही त्याचे जबरा फॅन आहेत तो खेळाडु म्हणजेच साक्षात क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर.

खर सांगायचं तर शालेय, महाविद्यालयात आम्ही मार्कांसाठी झगडतच राहिलो पण जर सरकारने क्रिकेट आणि सचिनसारखे विषय जर अभ्यासक्रमात आणले असते तर मी ‘सब्जेक्ट टॉपर’ तरी नक्कीच झालो असतो. सचिनची जन्मतारीख, विनोदबरोबरची 664 ची भागीदारी, शारदाश्रम, देवधर, दुलीप आणि रणजीमध्ये पदार्पणातच काढलेलं शतक, आचरेकरांची एक रूपयाची पैज ह्या आणि असंख्य गोष्टी बे ते तीस पाढ्यांपेक्षाही जास्त लक्षात आहेत.

रणजी, देवधर, दुलीप करंडकात शतक झळकावल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधीसाठी फार वाट पाहावी लागली नाही.(तो जसजसा खेळू लागला तसतशी स्पर्धा वाढली ही गोष्ट निराळी) एका वर्षातच तो पदार्पणासाठी सज्ज झाला. तारीख होती 15 नोव्हेंबर 1989 आणि प्रतिस्पर्धी होता पाकीस्तान. पाकिस्तानी खेळाडु वय वगैरे बघतच नाही. ‘ये बच्चा क्या मारेगा’ असं म्हणत त्यानी सचिनला डिवचले. अन् तो खेळाडु होता अब्दुल कादीर. कादीरच्या पुढच्याच ओवरला सचिनने चार षटकार आणि एका चौकारासकट आपला मुंबईकर खडुसपणा दाखवून दिला. प्रतिस्पर्धी खेळाडूंना प्रत्युत्तर तोंडानी नाही तर बॅटने कसं द्यायचंं याचा आदर्श वस्तुपाठच होता.

त्या सिरीजनंतर, घटनेनंतर सचिनचा वारू चौखूर उधळत होता. ओल्ड ट्रेफॉर्ड, सिडनी, पर्थ, जोहान्सबर्गच्या मैदानावर शतकं ठोकून आपल्या अस्तित्वाचा दाखला दिला आणि हा पुढे जाऊन काहीतरी बाप करणार ह्याची ग्वाहीही देऊ लागला होता. एकीकडे भारताचे दिग्गज फलंदाज लवकर आऊट होत असतांना हा मात्र इम्रान, डोनाल्डसारख्या दिग्गजांना लीलया खेळायचा. त्याचा मारलेला प्रत्येक कवर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, फ्लिक आणि नवनवीन शॉटमध्ये एड झालेला अप्पर कटही पुन्हा पुन्हा पाहावासा वाटायचा आणि अजुनही वाटतोच.

सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीची गाडी 95-96 नंतर पाचव्या गिअरमध्ये पळु लागली. कपिल, श्रीकांत, वेंगसरकर, यांचा अनुभव गाठीशी घेऊन एक प्रकारची नवी सुरुवातच होती ती. या गाडीने पहिलं स्टेशन गाठलं ते शारजाह. शारजाहच्या मैदानावर 22 एप्रिल आणि 24 एप्रिल या दिवशी वाळुच्या वादळाबरोबर सचिन वादळाचा तडाखा ऑस्ट्रेलियाला बसला होता. ऑस्ट्रेलिया विरूद्ध विजय मिळवुन दिलाच नाही तर वॉर्न, वॉ, कैस्प्रोव्हिच यांची झोपही खराब केली. सचिनची गाडी सुसाट होती… प्रत्येक स्टेशनला तो अविस्मरणीय करायचाच. दुसरं स्टेशन गाठलं ब्रिस्टॉल. प्लेटफॉर्म होता 99 विश्वचषक. वडिलांच्या निधनानंतर केलेले त्याचं पहिलं शतक आणि ते त्याने वडिलांना समर्पित केलं होतं. नंतर त्याची गाडी मायदेशातही फिरली. स्टेशन होतं हैद्राबाद. प्रतिस्पर्धी होता न्युझीलंड. त्या सामन्यात तडाखेबंद 183 धावांची मॅजिकल खेळी करुन सर्वोच्च धावसंख्या उभारली. 2000 साली नागपुर स्टेशनात झिम्बाब्वे विरुद्ध कारकीर्दीतील दुसरे द्विशतक केले. 2002 साली नैटवेस्ट सिरीज आणि इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजमध्येही आपल्या कामगिरीने झेंडा रोवला. 2003 विश्वचषक, सचिनच्या गाडीचा ऐतिहासिक क्षण……

या स्टेशनच्या दरम्यान सचिनने खोऱ्याने धावा केल्या. मालिकावीराचा किताबही जिंकला. 2004 साली सचिनच्या गाडीने स्टेशन गाठलं सिडनी आणि प्लेटफॉर्म होता व्हीबी सिरीज. एकही कव्हर ड्राईव्ह न खेळता मारलेल्या नाबाद 241 ही त्याच्यी टेस्ट मधली सगळ्यात बेस्ट खेळी होती. 2005 साली गावस्कर नामक जुन्या ट्रेनचा 10134 किमीचा(रन्सचा) विक्रम दिल्ली स्थानकात मोडला. २००६ साली डीएलएफ कपच्या प्लेटफॉर्मवर दुखापती, दुरुस्तीनंतर मलेशियामध्ये शतक मारून पुनरागमनाचा इशाराच जणू दिला होता. 2007  साली सचिनच्या गाडीची ग्रेग चैपल नामक ड्रायव्हरने आपल्या चाली, कसबी, युक्त्या वापरल्यामुळे ही गाडी वेस्ट इंडिजच्या प्लेटफॉर्मवर फार चालली नाही. भारत 07 सालच्या विश्वचषकात साखळीफेरीतच बाद झाला. 2008 साली ब्रायन लारा नामक विलायती गाडीचा 11953 किलोमीटरचा (रन्सचा) विक्रम मोहाली स्थानकात मोडला. 2009 साली सचिन एक्स्प्रेसनी आपल्या टेक्निक, स्टाईलमध्ये बराच बदल केला याची परिणीती हैदराबाद प्रांतात ऑस्ट्रेलिया विरूद्ध दिसुन आली या प्रवासात (खेळीत) त्याने अनेक विक्रम केले. या प्रवासात (खेळीत) त्याने 17000 किलोमीटर (रन्सचा) टप्पा गाठला. बदलत्या शैलीनुसार सचिनची गाडी बुलेट ट्रेनच्या तुलनेने पळु लागली होती. त्याची एक झलक 2010 साली ग्वाल्हेर स्थानकात दिसून आली. या प्रवासात “200” किमीची (रनची) सफर अवघ्या तीन तासात केली.

2011 साली भारतीय आणि क्रिकेट प्रेमींचं कुठल्याही सिरीजपेक्षा फक्त विश्वचषकाकडे सर्वाधिक लक्ष लागले होते. सचिनला सहाव्या संधीत विश्वचषकावर नाव कोरता येईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. धोनी ब्रिगेडनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सेहवाग, धोनी, स्वतः तेंडुलकर, नेहराचं अनुभव आणि चावला, पठाण ,कोहली, युवी यांचा जोश यांची उत्तम सांगड जमली होती. सचिनने आफ्रिकेला, इंग्लंडला आणि लाडक्या प्रतिस्पर्धी पाकला झोडपून काढत भारतला मजबूत धावसंख्या उभारण्यात हातभार लावला. अखेरीस भारत पाकला हरवुन फायनलला गेला. श्रीलंकेने दिलेले 275 धावांचं टारगेट धोनी- गंभीरमुळे सहजी पार झाले. धोनीने कुलसेखराला मारलेली “तो” षटकार या सर्व मोहीमेचा ‘गोड शेवटच’ होता आणि अखेरीस आपल्या ‘मास्टरचे’ 22 वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले.

एकुणच 23-24वर्षांच्या काळात सचिनच्या नावावर चांगले-वाईट असे बहुतांश रेकॉर्ड आहेत. सर्वाधिक रन्स, सर्वाधिक मॅचेसपासुन ते नर्वस 90’s पर्यंत सगळीकडे फक्त सचिन, सचिन आणि सचिन. पण एक रेकॉर्ड 2011 नंतर त्याच्यासह सर्व चाहत्यांचा चर्चेचा विषय होता तो म्हणजे शतकांचे शतक.कधी होणार? टेस्टमध्ये साहेबांनी आधीच 51 शतकं बनवली होती (हासुद्धा एक विक्रम) आणि वनडेमध्ये 48 (51-48=99) ‘ते’ एक शतक ना टेस्टमध्ये होत होतं ना वनडेमध्ये. कायम एका टेन्शन, एक्सपेक्टेशनमुळे तो लवकर आऊट व्हायचा किंवा शतकाच्या उंबरठ्यावर सचिन पॅवेलीयनच्या दिशेने निराश मनाने परतत होता. शेवटी तो दिवस आला जवळजवळ 14 महिन्यांनंतर. 16 मार्च 2012 ला सचिनने आशिया कपमध्ये कारकीर्दीतील शंभरावे शतक साजरं केलं. फिटनेसची समस्या या काळात जाणवू लागली. रिफ्लेक्सेस क्विक होत नव्हते त्यामुळे बहुतांशवेळा या कालावधीत तो बोल्ड किंवा एलबीडब्ल्यु झाला होता. लवकरच सचिन निवृत्ती घेणार असं प्रत्येकाला वाटत होतं. अखेरीस ती वेळ आलीच. सचिनची शेवटची दोन कसोटी सामन्यांची मालिका. पहिला सामना (सचिनचा199 वा कसोटी सामना ) कोलकत्याला आणि दुसरा आणि कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना घरच्या मैदानावर वानखडेवर होता. सचिन वानखेडेवर बॅटिंगला आला. त्या शेवटच्या इनिंग मध्ये काढलेल्या 73 धावा आणि पीचला वाकुन केलेला नमस्कार ही त्याची माणुसपणाची व खेळाप्रतीच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देतात.

कपिल पासुन कोहली पर्यंत सचिनने मैदानावर तीन पिढ्यांबरोबर ड्रेसिंग रूम शेअर केलं, अनेक मॅच जिंकल्या पण त्याच्या कामाची, खेळाची पोचपावती मिळाली जेव्हा भारत सरकारने त्याचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला आणि आमचा ‘तेंडल्या’, ‘सच्चु’ हा भारतरत्न सचिन तेंडुलकर झाला. “देवपण” मिळुनही माणुसपण जपणाऱ्या सचिनला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सचिनविषयीचे इतर लेख
सचिनची खोड काढणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पडले होते महागात, चाहत्याने दिले होते असे उत्तर!
…आणि सचिनला अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्हावे लागले होते खजील, वाचा ‘तो’ मजेदार किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment