आज (२४ एप्रिल) भारतीय संघाचा माजी कर्णधार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा वाढदिवस. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 11 वर्षे झाली. तरीही आजही असे अनेक विक्रम आहेत जे फक्त आणि फक्त सचिनच्या नावावर आहेत. त्यातील एक असाही विक्रम आहे जो जगातिल कोणत्याही क्रिकेटपटूला आपल्या नावावर व्हावा असे वाटेल.
वाढदिवसाच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या २५व्या वर्षी वनडेत शतकी खेळी केली होती. कोकाकोला कपच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शारजात १३४ धावांची ही खेळी केली होती. त्यावेळी तो वाढदिवसाच्या दिवशी वनडेत शतकी खेळी करणारा दुसराच फलंदाज ठरला होता.
सचिनपुर्वी त्याचाच मित्र विनोद कांबळीने असा पराक्रम केला होता. वाढदिवसाच्या दिवशी वनडेत पहिल्यांदा शतकी खेळी करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्याच नावावर आहे. त्याने १८ जानेवारी १९९३ रोजी वयाच्या २१ वर्षी शतक केले होते. त्याने ही शतकी खेळी इंग्लड संघाविरुद्ध केली होती.
सचिननंतर सनथ जयसुर्याने ३९व्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेश संघाविरुद्ध १३० धावांची खेळी कराची शहरात केली होती. तर अगदी अलिकडे राॅस टेलर हा जगातील ४था खेळाडू ठरला ज्याने वाढदिवसाच्या दिवशीच वनडेत शतकी खेळी केली होती. त्याने ८ मार्च २०११ मध्ये विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध १२४ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या. तेव्हा टेलरचे वय २७ वर्ष होते.
टॉम लॅथमने २ एप्रिल २०२२ ला आपल्या ३० व्या वाढदिवशी १४० धावांची शतकी खेळी केली. लॅथमने ही खेळी करताना वाढदिवसाच्या दिवशी सर्वोच्च खेळी करण्याच्या २४ वर्षे जुन्या सचिनच्या विक्रमाला मागे टाकले होते.