---Advertisement---

ऍडमच्या पेनल्टीवरील गोलमुळे मुंबईचा गोव्याला पराभवाचा धक्का

On: बुधवार, नोव्हेंबर 25, 2020 10:02 PM
---Advertisement---

गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी(25 नोव्हेंबर) मुंबई सिटी एफसीने एफसी गोवा संघावर 1-0 असा विजय मिळविला. इंग्लंडचा स्ट्रायकर ऍडम ली फाँड्रे याने पेनल्टी सत्कारणी लावत केलेला गोल निर्णायक ठरला.

पहिल्या सत्रात 40व्या मिनिटापासून दहा खेळाडूंनिशी खेळावे लागलेल्या गोव्याला झुंजार प्रयत्न करूनही पराभव टाळता आला नाही. यात मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने चोख कामगिरी पार पाडली. या निकालामुळे मुंबईचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी आपल्या आधीच्या क्लबला शह देत पहिला विजय नोंदविला.

पाच मिनिटांच्या अतिरीक्त वेळेतील तिसऱ्या मिनिटास मुंबईच्या सी गोडार्डने उजवीकडून गोलक्षेत्रात मुसंडी मारत गोव्याच्या दोन बचावपटूंना चकविले. त्याच्या क्रॉस शॉटवर बदली खेळाडू बिपीन सिंगने हेडिंग केले. त्यावेळी चेंडू गोव्याचा मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्जच्या हाताला लागला. गोलक्षेत्रात हे घडल्यामुळे पंच राहुलकुमार गुप्ता यांनी मुंबईला पेनल्टी बहाल केली. त्यावर ऍडमने गोल केला.

पहिल्या सत्रात पाच मिनिटांचा खेळ बाकी असताना गोव्याचा एक खेळाडू कमी झाला. गोव्याचा मध्यरक्षक रेडीम ट्लांगने मुंबईचा मध्यरक्षक हर्नान सँटानाला रोखले. चेंडूवर ताबा मिळवून हर्नान आगेकूच करीत असतानाच रेडीमने त्याला नियमबाह्य पद्धतीने रोखले. त्यामळे रेडीमला पंच राहुलकुमार गुप्ता यांनी लाल कार्ड दाखवून बाहेर काढले. त्याआधीच्याच म्हणजे 39व्या मिनिटाला हर्नान याला गोव्याचा मध्यरक्षक अल्बर्टो नोग्युराने पाडले होते.

तिसऱ्या मिनिटाला रेडीमने मुंबईचा बचावपटू अमेय रानवडेला चकवून चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली होती, पण प्रतिस्पर्धी मध्यरक्षक सी गोडार्डने त्याला रोखले.

पाचव्या मिनिटाला गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझने मारलेला चेंडू मुंबईचा मध्यरक्षक फारुख चौधरीने थोपविला. मग चेंडू गोलक्षेत्रात गेला, पण गोव्याच्या सुदैवाने गोलरक्षक महंमद नवाझने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

आठव्या मिनिटाला सामन्यातील पहिला कॉर्नर गोव्याला मिळाला. स्ट्रायकर इगोर अँग्युलो याने घेतलेल्या कॉर्नरवर चेंडू गोलक्षेत्रात गेला. त्यावर मध्य फळीतील अल्बर्टो नोग्युराने मारलेला फटका मात्र अकारण जास्त ताकदवान होता. त्यामुळे चेंडू त्याच्यापासून दूर गेला, जो मुंबईचा बचावपटू सार्थक गोलुईने बाहेर घालविला. त्यातून पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर विशेष काही घडले नाही.

दुसऱ्या सत्रात प्रारंभी मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंगने दमदार बचावाचे प्रदर्शन केले. 56व्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्जने उजवीकडून आगेकूच केली आणि चेंडू गोलक्षेत्रात मारला. मुंबईचा बचावपटू मुर्तडा फॉलने तो थोपविला, पण चेंडू सहा यार्ड बॉक्समध्येच होता. गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझने प्रयत्न केला, पण अमरींदरने क्षणार्धात उजवीकडे जात ही चाल रोखली.

तीन मिनिटांनी म्हणजे 59व्या मिनिटाला मुंबईने नेटच्या दिशेने पहिला फटका मारला. ह्युगो बुमूस याला गोलक्षेत्रात चेंडू मिळाला. उजवीकडे हालचाल करीत त्याने प्रयत्न केला, पण नवाझने अचानक उसळलेला चेंडू नीट अडविला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयएसएल २०२०: जमशेदपूरला पराभूत करत चेन्नईयनची सफाईदार सलामी

आयएसएल २०२०: शिल्पकार लॉबेरा बनले गोव्याचे प्रतिस्पर्धी

आयएसएल २०२०: सँटानाच्या पेनल्टीमुळे हैदराबादची ओडिसावर मात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---