टी20 विश्वचषक 2024 चे साखळी सामने संपले आहेत. आता बुधवारपासून (19 जून) सुपर 8 चे सामने सुरू होतील. भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.
दरम्यान, टी20 वर्ल्ड कपशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात मॅच फिक्सिंगचे प्रयत्न करण्यात आले. यासाठी युगांडाच्या एका खेळाडूशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे या खेळाडूनं तत्काळ आयसीसीकडे याची तक्रार केली.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, टी20 विश्वचषक 2024 च्या गट सामन्यांदरम्यान युगांडाच्या एका खेळाडूशी मॅच फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. केनियाच्या एका खेळाडूनं त्याला मॅच फिक्सिंगसाठी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल केला. महत्त्वाची बाब म्हणजे, युगांडाच्या खेळाडूनं याबाबत आयसीसीकडे तक्रार केली होती. मॅच फिक्सिंगशी संबंधित गुन्ह्यांबाबत आयसीसीनं अनेक कठोर नियम केले आहेत. यासाठी भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलही बनवण्यात आला आहे.
आयसीसीच्या एका सूत्रानं सांगितलं की, “मॅच फिक्सिंगसाठी युगांडाच्या खेळाडूशी संपर्क साधण्यात आला हे आश्चर्यकारक नाही. मोठ्या संघांच्या तुलनेत सहयोगी राष्ट्र संघांच्या खेळाडूंशी संपर्क करणं सोपं आहे.”
टी20 विश्वचषक 2024 मध्ये युगांडाने एकूण 4 सामने खेळले. यापैकी त्यांनी एक सामना जिंकला, तर 3 सामन्यांत त्यांचा पराभव झाला. युगांडानं पापुआ न्यू गिनीवर 3 गडी राखून विजय मिळवला होता. तर अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध संघाला पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे युगांडाचा संघ साखळी टप्प्यातूनच बाहेर पडला..
क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचा मोठा इतिहास आहे. आता आयसीसी याबाबत कठोर झाली आहे. मॅच फिक्सिंगमुळे काही खेळाडूंवर बंदीही घालण्यात आली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलीम मलिकवर मॅच फिक्सिंगसाठी बंदी घालण्यात आली होती. याशिवाय या प्रकरणी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा यांची नावही समोर आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू, टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही!
ट्रेंट बोल्टचा टी20 विश्वचषकाला निरोप! अखेरच्या सामन्यात केली जबरदस्त गोलंदाजी
टी20 विश्वचषकात निकोलस पूरनचा कहर! एकाच षटकात ठोकल्या 36 धावा, अनेक विक्रम मोडले