30 मेपासून 2019 विश्वचषक स्पर्धेला इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी आयसीसीने 22 अधिकांऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये 6 सामनाधिकारी आणि 16 पंचाचा समावेश आहे.
पंचांच्या यादीत सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचांना स्थान मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्यातील नो बॉल प्रकरणामुळे रवी हे चर्चेत आले होते.
या विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात द ओव्हल मैदानावर होणार असून या सामन्यासाठी तीन विश्वचषक विजेते अधिकारी असणार आहेत. या सामन्यात डेव्हिड बून हे सामनाधिकारी असतील. तर कुमार धर्मसेना, ब्रुस ऑक्सेनफोर्ड हे मैदानावरील पंच असतील. पॉल रिफेल हे तिसरे पंच असतील आणि जोएल विलसन चौथे पंच असतील.
यातील बून हे 1987 मध्ये ऍलेन बॉर्डर यांनी नेतृत्व केलेल्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे सदस्य होते. तसेच धर्मसेना हे 1996 च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाचे भाग होते. तर रेफेल हे 1999 च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघातील सदस्य होते.
आयसीसीने या 22 अधिकाऱ्यांची नियुक्ती ही साखळी फेरी समाप्त होईपर्यंत केली आहे. साखळी फेरी संपल्यानंतर उपांत्य फेरीसाठी आणि उपांत्य फेरी संपल्यानंतर अंतिम सामन्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.
या 22 अधिकाऱ्यांमध्ये समावेश असणारे इयान गोल्ड यांची पंच म्हणून ही शेवटची स्पर्धा असणार आहे. ते या विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार आहेत. पंच म्हणून हा त्यांचा चौथा विश्वचषक आहे.
तसेच सर्वात अनुभवी असणारे रंजन मदुगले हे त्यांच्या सातव्या विश्चचषकात अधिकारी म्हणून सहभागी होत आहेत. त्याचबरोबर ख्रिस ब्रॉड आणि जेफ क्रो या सामनाधिकाऱ्यांचा हा चौथा विश्वचषक आहे. तर अलिम दार यांचा पंच म्हणून पाचवा विश्वचषक आहे.
2019 विश्वचषकासाठी असे आहेत आयसीसीचे अधिकारी –
सामनाधिकारी – ख्रिस ब्रॉड, डेव्हिड बून, अँडी पायक्रॉफ्ट, जेफ क्रो, रंजन मदुगले, रिची रिचर्डसन
पंच – अलीम दार, कुमार धर्मसेना, मरायस इरॅसमस, ख्रिस गफॅनी, इयान गोल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, निगेल लाँग, ब्रूस ऑक्सनफोर्ड, सुंदरम रवी, पॉल रेफेल, रॉड टकर, जोएल विल्सन, मायकेल गॉफ, रुचिरा पल्लियागुरुज, पॉल विल्सन
महत्त्वाच्या बातम्या –
–या चार क्रिकेटपटूंची बीसीसीआयने केली अर्जून पुरस्करासाठी शिफारस
–पुरुषांच्या वनडे सामन्यात अंपायरिंग करणारी ती बनली पहिला महिला…
–रोहित शर्माचा मोठा खूलासा, या कारणामुळे चेन्नई सुपर किंग्सचा झाला पराभव






