गोवा| मागील चार सामन्यांत विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या एटीके मोहन बागानसमोर हिरो इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) मंगळवारी तगड्या नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान असणार आहे. युनायटेडनं मागील लढतीत विजय मिळवताना मनोबल उंचावले आहे. त्यामुळे एटीकेला मोहन बागानसाठी हा सामना कागदावर जरी सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात त्यांचा कस लागणार आहे.
फतोर्डा येथील पीजेएन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. सलग चार सामन्यांत विजय मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर एटीके मोहन बागान यांनी मुख्य प्रशिक्षक अँटोनियो लोपेझ हबास यांच्यासोबतचा करार शनिवारी संपुष्टात आणला. एटीके मोहन बागान सध्या गुणतालिकेत ८ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत. हबास यांच्या मार्गदर्शनाखाली एटीकेनं २०१५ व २०१९-२० मध्ये जेतेपद पटकावले होते आणि दोन आयएसएल जेतेपद जिंकणारे ते पहिले प्रशिक्षक आहेत. हबास यांच्या जागी ज्युआन फेरांडो ही जबाबदारी सांभाळणार असल्याची शक्यता आहे. स्पॅनिस प्रशिक्षक फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यांना पहिल्या तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्धच्या सामन्यात एटीके मोहन बागानला त्यांच्या बचावफळीत सुधारणा करण्याची खरी गरज आहे. त्यांना आतापर्यंत एकाच सामन्यात प्रतिस्पर्धींना गोल करण्यापासून रोखण्यात यश आलं आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धींनी १३ गोल्स केले आहेत आणि हाही त्यांच्या चिंतेचा विषय आहे. प्रभारी प्रशिक्षक मॅन्युएल कॅस्काल्लाना यांनी सांगितले की,”मुख्य प्रशिक्षक नसताना आता खेळाडूच मुख्य भूमिकेत आहेत. आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरच आहे. त्यामुळे पराभूत झाल्यास तुम्ही प्रशिक्षक किंवा टॅक्टिकला दोष देऊ शकत नाही. आता खेळाडूंना पुढाकार घेऊन खेळायला हवं. आता एकच लक्ष्य, विजय अन् तीन गुण.” सध्याच्या परिस्थितीचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, असे साहाय्यक प्रशिक्षक बॅस्टॅब रॉय यांना वाटते.
दुसरीकडे नॉर्थ ईस्ट युनायटेड सात गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. त्यांनी मागील लढतीत एससी ईस्ट बंगालवर २-० असा विजय मिळवला आहे. बचावपटू हर्नान सँटाना आणि स्ट्रायकर देशोर्न ब्राऊन यांच्याशिवाय नॉर्थ ईस्ट युनायटेडनं मागील सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये उल्लेखनीय खेळ केला होता. मध्यरक्षक खास्सा चमारा याचाही खेळ कौतुकास्पद झाला होता. त्यानं या पर्वात सर्वाधिक ९३ टच लावले आहेत आणि नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून ही सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.
”एटीके मोहन बागान हा चांगला संघ आहे, परंतु आम्ही फक्त आमचा विचार करतोय. मागील सामन्यातील आमची कामगिरी चांगली झाली होती आणि त्यात सातत्य राखण्याची गरज आहे. खेळाडू सकारात्मक आहेत आणि तेही याच मानसिकतेनं खेळण्याचा त्यांचा निर्धार आहे,” असे प्रशिक्षक खालिद जामिल यांनी सांगितले. ब्राऊन आणि सँटाना हे या सामन्यात खेळतील हे अपडेट्सही त्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई सिटी एफसीला विजयासाठी चेन्नईयन एफसीनं झुंजवले, अखेरच्या क्षणाला राहुल भेकेचा विजयी गोल
बेंगलोरची पराभवाची मालिका खंडित; एटीकेविरूद्ध मानावी लागली ३-३ अशी बरोबरी
व्हिडिओ पाहा – फ्रीस्टाईल फुटबॉल म्हणजे काय हे माहिती आहे का तुम्हाला?
https://www.youtube.com/watch?v=7a9pPwt-oPo