---Advertisement---

खेळपट्टीवर गवत पाहून भारतीय खेळाडू हैराण, द्रविडच्या ‘या’ सल्ल्याने वाढवले संघाचे मनोबल, पाहा व्हिडिओ

Team-India
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. २६ डिसेंबर म्हणजेच बॉक्सिंग डे पासून कसोटी सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी दोन्ही संघ कसोटी मालिकेची जोरदार तयारी करत असून भारतीय खेळाडूंच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात पहिला कसोटी सामना सेंच्यूरियनमधील सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियममध्ये (SuperSport Park, Centurion) होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ (Team India) सेंच्यूरियनला पोहचला असून स्टेडियममध्ये सरावाला (Practice Session) सुरुवात केली आहे. त्यांच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओची छोटी झलक बीसीसीआयने ट्विटरवरही शेअर केली आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की, सर्व भारतीय खेळाडू पूर्ण जोशाने सराव करत आहेत. तसेच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खेळपट्टी पाहून आश्चर्यचकीत झाल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, या खेळपट्टीवर खूप गवत आहे. त्यामुळे इथे चेंडूला खूप उसळी मिळणार. त्याच्या म्हणण्यानुसार या खेळपट्टीवर फलंदाजांची वेगवान गोलंदाजांसमोर कसोटी लागणार आहे. अय्यरने नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आहे. 

मात्र, असे असले तरी व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) एक महत्त्वपूर्ण सल्ला देतानाही दिसत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पूर्ण जोशात आणि गुणवत्तापूर्ण सराव करा. बाकी गोष्टींचा विचार करू नका. 

त्याचबरोबर, जेव्हा श्रेयस वेगवान गोलंदाज इशांत शर्माला खेळपट्टीविषयी प्रश्न विचारतो, तेव्हा इशांत म्हणाला की, ‘विकेटमध्ये खूप ओलावा आहे. यावर चेंडूला खूप मुव्हमेंट मिळेल. इथे फलंदाजी करणे कठीण असणार आहे.’

या व्हिडिओमध्ये मोहम्मद शमी विराट कोहलीला बाउंसर चेंडू फेकतानाही दिसला. तसेच इशांत शर्माही जोशात गोलंदाजी करताना दिसत आहे.

फलंदाजी सोपी नसेल
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले की, ‘आम्ही मधल्या खेळपट्टीवर सराव केला. ढगाळ वातावरण आणि थंड वातावरणामुळे फलंदाजांना या खेळपट्टीवर टिकून खेळणे कठीण असेल.’ त्याचबरोबर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी सांगितले की, ‘गोलंदाजांसाठीही या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे सोपे नसणार, कारण त्यांना आपली लेंथ खेळपट्टीच्या स्वभावानुसार बदलावी लागेल.’

https://twitter.com/BCCI/status/1472788564366684160

दोन्ही संघात वेगवान गोलंदाजांचा भरणा 
दक्षिण आफ्रिकेत नेहमीच वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिल्याचे दिसले आहे. त्याचप्रमाणे सेंच्यूरियनमध्ये पहिल्या कसोटीतही तसेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांचा कस लागेल. कारण, दोन्ही संघांकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत.

दक्षिण आफ्रिका संघात कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किया सारखे अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. तसेच त्यांना मायभूमीत खेळण्याचा फायदाही असेल. पण, त्याचबरोबर भारताकडेही चांगल्या वेगवान गोलंदाजांची फळी आहे. भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, इशांत शर्मा, उमेश यादव अशा वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे.

भारताला इतिहास रचण्याची संधी
दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाने यापूर्वी कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. शेवटच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ मालिका विजयाच्या जवळ होता, मात्र मालिका जिंकण्यात अपयशी ठरला. त्यामुळे यंदा भारतीय संघाचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ

भुवनेश्वर कुमारने शेअर केला नवजात मुलीचा पहिला फोटो; चाहते म्हणाले, ‘नाव तरी सांगा’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---