आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला. त्यामुळे श्रीलंका सुपर-८मध्ये पोहोचला आहे, मात्र या सामन्यात त्यांच्यासाठी एक चिंता वाढवणारी घटना घडली. वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना दुखापतग्रस्त झाला. तो त्याच्या पहिल्याच षटकात गोलंदाजी करताना जखमी झाला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात तिसऱ्या षटकात गोलंदाज करताना पथिराना थांबला तेव्हा त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे दिसले. त्याने ते षटक पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला. त्याचे ते षटक कर्णधार दसुन शनाकाने टाकले. त्याने एक चौकार दिला तर एक चेंडू निर्धाव गेला. पथिरानाने त्या षटकातील चार चेंडू टाकले असता त्याने ३ धावा दिल्या.
पथिराना मैदानाबाहेर जाताना अडखळताना दिसला. श्रीलंकेच्या संघातून आधीच फिरकीपटू वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. तो या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला. आयर्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने ४ षटकात २५ धावा देत ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. हसरंगाच्या जागी दुशन हेमंथाला संघात घेतले आहे.
हसरंगा हा श्रीलंकेचा महत्वाचा गोलंदाज बाहेर झाला आणि आता ते पथिरानाच्याबाबतीत कोणतीही जोखीम घेऊ शकत नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील सर्वाधिक वेळ पथिरानाने ड्रेसिंग रुममध्येच घालवला. यामुळे तो गोलंदाजीसाठी परतलाच नाही. तसेच सामन्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी पाठवले गेले. त्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. तो संघाचा डेथ ओव्हर्समधील उत्तम गोलंदाज आहे.
या स्पर्धेत श्रीलंका सुपर-८मध्ये पोहोचला असला तरी आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांचा प्रवास सुखकर होताना दिसत नाही. या स्पर्धेत श्रीलंकेने त्यांचे खेळलेले तिन्ही ग्रुपचे सामने जिंकले आहेत. यामधील शेवटचा सामना १९ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आहे. त्यानंतर सुपर-८चे सामने सुरू होणार आहेत.
श्रीलंकेचा सुपर-८चा पहिला सामना २२ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध आणि दुसरा सामना २५ फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध आहे. तिसरा सामना २८ फेब्रुवारीला खेळला जाणार असून यामध्ये ते पाकिस्तान किंवा यूएसएचा सामना करू शकतात.






