चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. तो पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग नव्हता. आता त्याच्या अनुपस्थितीबाबत अपडेट समोर आलं आहे.
‘ज्युनियर मलिंगा’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या पाथिरानाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून, याच्या उपचारासाठी तो मायदेशी म्हणजेच श्रीलंकेला परतला आहे. यामुळे तो आता आयपीएलच्या पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी संमिश्र राहिली आहे. संघानं १० पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून ५ सामन्यांमध्ये त्यांच्या पराभव झाला आहे. असं असलं तरी, माथिशा पाथिरानानं या हंगामात खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पाथिरानाच्या अनुपस्थितीचा संघाच्या गोलंदाजीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
माथिशा पाथिरानानं या हंगामात खेळलेल्या फक्त 6 सामन्यांमध्ये 13 बळी घेतले आहेत. 28 धावांत 4 बळी ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी राहिली. चेन्नईचे सध्या बरेच गोलंदाज विविध कारणांमुळे संघाबाहेर आहेत. मुस्तफिजूर रहमान झिम्बाव्बेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी मायदेशी परतला आहे. तर महेशा थिक्ष्णा व्हिसाच्या कामासाठी श्रीलंकेला परतला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर जखमी झाला असून, तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. तर तुषार देशपांडे आजारी आहे.
माथिशा पाथीराना 2022 मध्ये चेन्नईमध्ये सामील झाला होता. त्याला संघानं 20 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके पाचव्यांदा चॅम्पियन बनली त्यात पाथीरानाच्या गोलंदाजीचा मोठा वाटा होता. गेल्या मोसमात त्यानं चेन्नईसाठी 12 सामन्यात 19 बळी घेतले होते. 15 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.
टी20 विश्वचषक 2024 पूर्वी पथिराना दुखापतग्रस्त होणं श्रीलंकेसाठी चांगलं नाही. कारण तो असा गोलंदाज आहे, ज्याला कठीण परिस्थितीत विकेट कश्या काढायच्या हे माहित आहे. विशेषत: त्याची बॉल फेकण्याची शैली महान गोलंदाज लसिथ मलिंगासारखी असल्यानं तो विरोधी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ऋतुराज गायकवाडचं नशीबच फुटकं! ११ पैकी १० सामन्यांमध्ये हरला टॉस; लवकरच करणार लाजिरवाणा विक्रम
चेन्नईविरुद्ध टॉस जिंकून पंजाबची गोलंदाजी, सॅन्टनरचा प्रथमच संघात समावेश; जाणून घ्या प्लेइंग ११