न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा तो न्यूझीलंडचा संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला.
या लिस्टमध्ये दिग्गज क्रिकेटपटू रिचर्ड हॅडलीचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. त्यांनी 25 कसोटी सामन्यात 100 बळी घेण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आता नील वॅगनरसह मॅट हेन्रीचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आलं आहे. या दोघांनी 26 सामन्यांमध्ये 100 बळी घेतले. या यादीत ब्रूस टेलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. टेलरनं 27व्या कसोटी सामन्यात 100 बळी घेतले.
न्यूझीलंडसाठी सर्वात वेगवान 100 विकेट घेणारे गोलंदाज
रिचर्ड हॅडली – 25 सामने
नील वॅगनर – 26 सामने
मॅट हेन्री – 26 सामने
ब्रुस टेलर – 27 सामने
बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात मॅट हेन्रीची कामगिरी अतिशय दर्जेदार होती. त्यानं आपल्या संघासाठी 13.2 षटकं टाकली आणि 1.10 च्या इकॉनॉमीनं 15 धावा देत 5 बळी घेतले. त्यानं सरफराज खान (0), रिषभ पंत (20), रवींद्र जडेजा (0), रविचंद्रन अश्विन (0) आणि कुलदीप यादव (02) यांचे बळी घेतले.
चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना भारताला 31.2 षटकात केवळ 46 धावा करता आल्या. यासह घरच्या मैदानावर सर्वात कमी धावांचा 37 वर्ष जुना विक्रम मोडला गेला. यापूर्वी 1987 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत भारतीय संघ 75 धावांत ऑलआऊट झाला होता.
मॅट हेन्रीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं आतापर्यंत न्यूझीलंडसाठी एकूण 26 कसोटी सामने खेळले. त्यानं कसोटीच्या 50 डावांमध्ये 30.94 च्या सरासरीनं 100 बळी घेतले आहेत. 23 धावांत 7 बळी ही कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
हेही वाचा –
भारत 46 धावांवर ऑल आऊट! रोहित ब्रिगेडच्या नावे अनेक लज्जास्पद विक्रमांची नोंद
बंगळुरूमध्ये किवी गोलंदाजांची ‘दहशत’, टीम इंडिया पन्नाशीच्या आत गडगडली; 5 फलंदाज शून्यावर बाद
आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली! कधी आणि कुठे होणार लिलाव? जाणून घ्या