मुंबई । किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान आयपीएल 2020 चा दुसरा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जिंकला आणि या सामन्याच्या विजयासह दिल्ली संघानेही गुणतालिकेमध्ये 2 महत्त्वाचे गुण मिळवले.
या सामन्यात मयंक अगरवालने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 60 चेंडूंत 89 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. मात्र, या शानदार खेळीनंतरही किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला हा सामना जिंकता आला नाही. मयंकने या शानदार खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार लगावले होते.
जेव्हा पंजाबच्या संघाला शेवटच्या 3 चेंडूंत केवळ 1 धावांची आवश्यकता होती, तेव्हा मयंक अगरवाल मार्कस स्टोयनिसच्या चेंडूवर शिमरोन हेटमीयरकरवी झेलबाद झाला. त्याच वेळी, पुढचा चेंडू निर्धाव गेला आणि ख्रिस जॉर्डन शेवटच्या चेंडूवर बाद झाला, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
सामना सुपर ओव्हरवरमध्ये गेल्यानंतर कागिसो रबाडा दिल्लीकडून गोलंदाजीसाठी आला. चाहत्यांना वाटले की, पंजाबकडून मयंक अगरवाल फलंदाजीला येईल, पण तसे झाले नाही, पंजाबकडून केएल राहुल आणि निकोलस पूरन फलंदाजीसाठी आले.
राहुल बाद झाल्यावरही ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीस आला. पण पूरनही बाद झाल्याने सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा संघ केवळ 2 धावा करू शकला. दिल्लीला अवघ्या 3 धावांचे लक्ष्य मिळाले, त्यापैकी शमीने एक वाइड बॉल टाकला आणि रिषभ पंतने 2 धावा करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर अनेकांना फॉर्ममध्ये असलेला मंयक सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला का आला नाही असा प्रश्न पडला होता. पण आता याबद्दल खुद्द मयंक अगरवालनेच खुलासा केला आहे. त्याने म्हटलं आहे की, त्याच्या पायाला क्रॅम्प आला होता, त्यामुळे त्याने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला.
पंजाबला दिल्ली विरुद्ध जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी काल(24 सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला 97 धावांनी पराभूत करत हंगामातील पहिला विजय मिळवला.