आयपीएल २०२१ (IPL 2022) नंतर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने फ्रेंचायझीची साथ सोडली. आता तो आयपीएल २०२२ साठी लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी खेळताना दिसणार आहे. लखनऊ संघाने केएल राहुलसाठी मोठी रक्कम मोजली आणि त्याला संघाचा कर्णधार बनवले आहे. या आयपीएल हंगामापासून लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स संघ स्पर्धेत नव्याने सहभागी होणार आहेत. दरम्यान, केएल राहुलने पंजाब संघापासून आपला मार्ग वेगळा केलेला असल्याने या संघाला नव्या कर्णधाराची गरज आहे. अशात अशी माहिती समोर येत आहे की, मयंक अगरवाल (Mayank Agarwal) पंजाब किंग्जचा नवीन कर्णाधार असेल.
पंजाब किंग्जने आद्याप त्यांच्या नवीन कर्णधाराचे नाव घोषित केले नाही. परंतु पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब किंग्ज आता मयंक अगरवालला संघाचा नवीन कर्णधार बनवू शकते. सूत्राने सांगितेल की, “पूर्ण शक्यता आहे की, मयंक अगरवाल या हंगामात संघाचे नेतृत्व करेल. या आठवड्याच्या शेवटीपर्यंत याविषयी अधिकृत घोषणा केली जाईल.”
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने दिग्गज फलंदाज शिखर धवनला विकत घेतले. अशात धवन पंजाबचा नवीन कर्णधार असेल, अशी सर्वत्र चर्चा होती. याविषयी बोलताना सूत्राने सांगितले की, “धवनचे संघात स्वागत आहे आणि लिलावादरम्यान संघाची त्याच्यावर नजर होती. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे, पण असे वाटत आहे की, केएल राहुलने पंजाब संघ सोडल्यानंतर फ्रेंचायझी कर्णधाराच्या रूपात मयंकविषयी जास्त उत्सुक होती.”
मयंक अगरवाल आयपीएल २०१८ पासून पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. केएल राहुल जेव्हा संघाचा कर्णधार होता, तेव्हा त्याच्या अनुपस्थितीत अनेकदा मयंकने संघाचे नेतृत्व केले आहे. आयपीएल २०२१ नंतर पंजाबने मयंकला १२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले होते. मागच्या दोन आयपीएल हंगामात त्याने वैयक्तिक ८०० पेक्षा जास्त धावा साकारल्या आहेत. आयपीएल २०२१ मध्ये त्याने चार अर्धशतकांच्या मदतीने ४४१. तसेच २०२० मध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने ४२४ धावा केल्या होत्या. आगामी हंगामात त्याच्या प्रदर्शनावर सर्वाचे लक्ष लागून असणार आहे.